सिडनी, 28 नोव्हेंबर : भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाचा 66 रनने विजय झाला. याचसोबत ऑस्ट्रेलियाने तीन मॅचच्या वनडे सीरिजमध्ये 1-0ने आघाडी घेतली आहे. सीरिजची दुसरी वनडे रविवारी सिडनीमध्येच होणार आहे, पण या वनडेआधीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का लागला आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) याला दुखापत झाली आहे, त्यामुळे तो दुसरी वनडे खेळण्याबाबत शंका उपस्थित झाली आहे.
पहिल्या मॅचमध्ये बॉलिंग करत असताना सातव्या ओव्हरचा दुसरा बॉल टाकल्यानंतरच स्टॉयनिसला त्रास व्हायला लागला, यानंतर तो मैदानातून बाहेर गेला. स्टॉयनिसची राहिलेली ओव्हर ग्लेन मॅक्सवेलने पूर्ण केली. क्रिकेट.कॉम.एयू याने दिलेल्या वृत्तानुसार 31 वर्षांच्या स्टॉयनिसच्या पोटाच्या डाव्या बाजूला दुखायला सुरूवात झाली. दुखापत गंभीर असल्यामुळे स्टॉयनिसचं स्कॅनिंग करण्यात येणार आहे.
स्टॉयनिसच्या दुखापतीमुळे दुसऱ्या वनडेसाठी कॅमरन ग्रीन किंवा मोयसेस हेनरिक्स यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. पहिल्या वनडेमध्ये स्टॉयनिस शून्य रनवर आऊट झाला होता.
स्टॉयनिसची तब्येत कशी आहे हे मला माहिती नाही, कारण मी त्याला बघितलं नाही. पण तो लवकरच बरा होईल, अशी अपेक्षा करू, असं वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथने केलं आहे. स्टॉयनिस खेळला नाही तर कॅमरन ग्रीन खेळू शकतो, कारण शेफील्ड शिल्डमध्ये त्याने बॅटिंग आणि बॉलिंगमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशी प्रतिक्रिया स्मिथने दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.