ऍडलेड, 16 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy)ला गुरूवार (17 डिसेंबर) पासून सुरूवात होणार आहे. ऍडलेडच्या मैदानात गुलाबी बॉलने हा सामना डे-नाईट खेळवला जाईल. या सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग तीन टेस्ट सीरिज जिंकण्याची संधी सध्या भारताकडे आहे. या आधीच्या दोन टेस्ट सीरिजमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. त्यामुळे ही मालिका भारताने जिंकली तर सलग तीन टेस्ट सीरिज जिंकण्याचा विक्रम भारताच्या नावे नोंदवला जाईल.
गेल्यावेळी भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशात 2-1 ने टेस्ट सीरिजमध्ये पराभूत केलं होतं. हा भारताचा ऑस्ट्रेलियातील पहिला कसोटी मालिका विजय होता. ऑस्ट्रेलियाच्या टीमला त्यांच्याच देशात पराभूत करणारा विराट हा पहिला भारतयी आणि आशियाई कर्णधार होता. तर त्याआधी ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर आली असतानाही विराटच्या टीमने त्यांना पराभवाची धूळ चारली होती. आतापर्यंत ऑस्ट्रेलियात झालेल्या 12 टेस्ट मालिकांपैकी भारताने 8 मध्ये पराभव स्वीकारला असून 3 अनिर्णित राखल्या आहेत.
1947-48 मध्ये झाली होती पहिली कसोटी मालिका
भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातली पहिली टेस्ट सीरिज 1947-48 मध्ये खेळवली गेली होती त्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. या दोन देशांतील शेवटची टेस्ट मालिका 2018-19 मध्ये झाली होती. जी भारताने जिंकली होती.
भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट रेकॉर्ड असं आहे
1947-48 पासून आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 26 टेस्ट सीरिज झाल्या आहेत. त्यातील 12 ऑस्ट्रेलियाने तर 9 भारताने जिंकल्या आहेत आणि 5 टेस्ट मालिका अनिर्णित राहिल्या आहेत. भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया अशा 98 टेस्टपैकी 42 मध्ये ऑस्ट्रेलिया तर 28 मध्ये भारताला विजय मिळाला आहे. यापैकी 27 टेस्ट अनिर्णित आणि एक टाय पण झाली आहे.
ऍडलेड आणि मेलबर्नमध्ये भारताचा विजय
या टेस्ट सीरिजमधील चार सामने ऍडलेड, मेलबर्न, सिडनी आणि ब्रिस्बेन इथं होणार आहेत. 2018-19 च्या बॉर्डर-गावस्कर सीरिजमध्ये भारताने ऍडलेडमधल्या सामन्यात 31 रननी तर मेलबर्नमधील सामन्यात 137 रननी ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. सिडनीत झालेला शेवटचा सामना अनिर्णित राहिला होता, तर पर्थच्या मैदानावर झालेला सामना ऑस्ट्रेलियाने 146 रननी जिंकला होता.