सिडनी, 1 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आयपीएल (IPL 2020) च्या कडू आठवणींना विसरून पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आला आहे. भारताविरुद्धच्या वनडे सीरिजच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये मॅक्सवेलने शानदार बॅटिंग केली. पहिल्या दोन मॅचमध्ये मॅक्सवेलने एकूण 110 रन केले. दुसऱ्या वनडेमध्ये मॅक्सवेलने वादळी अर्धशतक केलं. मॅक्सवेलने आक्रमक शॉट्स खेळून भारतीय बॉलरची पिसं काढली, पण ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू इयन चॅपल (Ian Chappell) यांनी मॅक्सवेलच्या या शॉट्सवर आक्षेप घेतला आहे.
मॅक्सवेलने केलेलं स्विच हिटिंग बॉलर आणि फिल्डर यांच्यासाठी अन्यायकारक आहे. आयसीसीने या शॉट्सवर बंदी घालावी, अशी मागणीही चॅपल यांनी केली आहे. वाईड वर्ल्ड ऑफ स्पोर्ट्ससोबत इयन चॅपल बोलत होते.
'ग्लेन मॅक्सवेल आणि स्टीव्ह स्मिथ अगदी सहजपणे बॅटिंग करतात. स्विच हिटिंग करायला खूप कौशल्य लागतं. काही स्विच हिट पाहून मीदेखील चकीत झालो, पण हे योग्य नाही. जर अंपायर बॉलरला बॉलिंग कशी करायची हे सांगत असेल, तर बॅट्समनलाही तू स्विच हिट मारू शकत नाहीस, असं सांगितलं गेलं पाहिजे. आयसीसीने स्विच हिटला बेकायदेशीर घोषित केलं पाहिजे. हे करणं सोपं आहे. मॅक्सवेलने खूप स्विच हिट मारले. डेव्हिड वॉर्नरनेही तेच केलं. जर बॅट्समन शॉट मारताना हाताची जागा बदलत असेल, तर त्याला बेकायदेशीर ठरवलं गेलं पाहिजे,' अशी प्रतिक्रिया इयन चॅपल यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.