मुंबई, 8 डिसेंबर : भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात (India vs Australia) हार्दिक पांड्या (Hardik Pandya) शानदार फॉर्ममध्ये आहे. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पासून सगळेच पांड्याच्या आक्रमक बॅटिंगचं कौतुक करत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये पांड्याने शेवटच्या ओव्हरमध्ये दोन सिक्स मारून भारताला विजय मिळवून दिला. याचसोबत भारताने टी-20 सीरिजही खिशात टाकली. हार्दिक पांड्याच्या या बदलेल्या खेळीबाबत त्याचे प्रशिक्षक जितेंद्र सिंग यांनी भाष्य केलं आहे.
मोबाईलवर पाठवला व्हिडिओ
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार जून महिन्यात लॉकडाऊनवेळी हार्दिक पांड्या बडोद्यामध्ये सराव करत होता. एक महिन्याच्या सरावानंतर त्याचे प्रशिक्षक जितेंद्र सिंग गावाला परत गेले, पण पांड्याने जितेंद्र यांना तुम्ही जात आहात, पण माझ्या शॉटमध्ये काही कमी राहिली असेल, तर परत यावं लागेल, असं सांगितलं. पण पांड्याने जितेंद्र सिंग यांना त्याच्या बॅटिंगचे 60-70 व्हिडिओ पाठवले. या व्हिडिओमध्ये पांड्याचे वेगवेगळे बॅटिंग शॉट्स होते. माझे शॉट बरोबर आहेत का? असंही पांड्याने प्रशिक्षकांना मेसेज करून विचारलं.
काय म्हणाले हार्दिकचे प्रशिक्षक?
वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये हार्दिकचे प्रशिक्षक जितेंद्र सिंग म्हणाले, 'माझ्यामध्ये आणि हार्दिकमध्ये डील झाली होती. त्याच्या व्हिडिओमध्ये काही त्रुटी असतील, तर मला पुन्हा बडोद्याला यावं लागेल. पण त्याच्या शॉट्समध्ये काहीही त्रुटी नव्हत्या. पांड्या त्यावेळी पिता बनणार होता, त्यामुळे पत्नीकडे गेला. तो जेव्हा सरावासाठी यायचा तेव्हा डोकं, पाय आणि हात नीट आहेत ना, असं विचारायचा. दोन मोसमांआधी त्याने स्टान्स बदलला. आता तो क्रीजच्या आत जाऊन शॉट मारू शकतो, त्याला आता बाऊन्सर आणि यॉर्करचीही भीती वाटत नाही.'
ऑस्ट्रेलियाविरुद्ध रविवारी सिडनीमध्ये झालेल्या मॅचमध्ये पांड्याने 22 बॉलमध्ये 42 रनची खेळी केली. लॉकडाऊनमध्ये आपण मॅच संपवण्याचा सराव केल्याचं पांड्याने मॅचनंतर सांगितलं. रन बनत आहेत का नाही, याकडे लक्ष देण्यापेक्षा मी मॅच संपवणं हाच माझा उद्देश होता, असं पांड्या म्हणाला. त्याआधी आयपीएलवेळी आपण बॅटिंगच्या तंत्रावर काम करत असल्याचंही पांड्याने सांगितलं होतं.