सिडनी, 28 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडिया (India vs Australia) चा 66 रननी पराभव झाला. टीममध्ये सहावा बॉलर आणि ऑलराऊंडर नसणं हे भारताच्या पराभवाचं मुख्य कारण असल्याचं मत अनेकांनी मांडलं, तसंच हार्दिक पांड्या (Hardik Pandya) बॉलिंग करत नसल्यामुळे आम्हाला सहाव्या बॉलरची कमी जाणवली, असं कर्णधार विराट कोहलीने मान्य केलं. यावर आता खुद्द हार्दिक पांड्याने भाष्य केलं आहे. योग्य वेळ असेल तेव्हाच आपण बॉलिंग करू, असं हार्दिक म्हणाला आहे. तसंच दुसऱ्या ऑलराऊंडरला शोधण्याचा सल्लाही पांड्याने टीम इंडियाला दिला आहे.
पाठीच्या दुखापतीमुळे हार्दिक पांड्यावर मागच्या वर्षी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर पांड्याने बॉलिंग केली नाही. या दुखापतीमुळे पांड्या अजूनही बॉलिंग करण्यासाठी तयार झालेला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये पांड्याने 76 बॉलमध्ये 90 रनची खेळी केली.
'मी माझ्या बॉलिंगवर काम करत आहे. बॉलिंग करेन पण योग्य वेळ आली की. नेटमध्ये बॉलिंगला सुरुवात केली आहे, पण जेव्हा मी 100 टक्के देत असेन तेव्हाच बॉलिंगला सुरुवात करणार. आंतरराष्ट्रीय स्तरावर गरजेचा असलेल्या गतीने बॉलिंग करायची आहे,' असं पांड्या म्हणाला.
आयसीसी टी-20 वर्ल्ड कपला आता 10 महिने बाकी आहेत. टी-20 वर्ल्ड कपवर लक्ष ठेवून आपण बॉलिंग सुरू करणार असल्याचे संकते पांड्याने दिले. 'आम्ही भविष्याबाबत विचार करत आहोत. टी-20 वर्ल्ड कप आणि इतर स्पर्धा आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. या स्पर्धांमध्ये माझी बॉलिंग महत्त्वाची असेल,' अशी प्रतिक्रिया पांड्याने दिली.
नवीन ऑलराऊंडर शोधावा लागेल
'भारताला ऑलराऊंडर खेळाडूबाबत विचार करावा लागेल. कारण सहावा बॉलर टीमच्या संतुलनासाठी महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे योग्य पर्याय निवडून त्याला खेळवलं गेलं पाहिजे. पाच बॉलर घेऊन खेळतो तेव्हा गोष्टी कठीण होतात. एखाद्या बॉलरचा दिवस चांगला नसेल, तर त्याची भूमिका निभावायला दुसरा खेळाडू नसतो,' असं हार्दिकने सांगितलं.
कृणालला संधी?
सहावा बॉलर म्हणून उपलब्ध असलेल्या पर्यायांबाबत विचारलं असता हार्दिकने त्याचा भाऊ कृणालचा पर्याय सुचवला. कृणाल पांड्या हा स्पिनर ऑलराऊंडर आहे. आयपीएलमध्ये मुंबईसाठी कृणालने चांगली कामगिरी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.