सिडनी, 15 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या टेस्ट सीरिजला 17 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. ऍडलेडच्या मैदानात गुलाबी बॉलने पहिली डे-नाईट टेस्ट खेळवली जाईल. ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट खेळणं आव्हानात्मक आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा खेळाडू शुभमन गिल (Shubhaman Gill) याने दिली आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्लेजिंग आणि शॉर्ट पिच बॉलिंगसाठी आपण तयार असल्याचंही शुभमन गिल म्हणाला आहे. सराव सामन्यामध्ये गिलने दोन इनिंगमध्ये 43 रन आणि 65 रन केले होते.
आयपीएलच्या केकेआरकडून खेळणारा 21 वर्षांचा शुभमन गिल ऑस्ट्रेलियात टेस्ट पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. एक बॅट्समन म्हणून ऑस्ट्रेलियात खेळण्यापेक्षा मोठी संधी कोणतीही असू शकत नाही, कारण इकडे रन बनवण्यात यश आलं तर तुमचा आत्मविश्वास खूप वाढतो, असं गिलने केकेआरच्या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या मैचमध्ये मैदानात बाचाबाचीचे अनेक प्रसंग आतापर्यंत झाले आहेत. भारतीय टीम याला घाबरणार नाही. एक वेळ होती जेव्हा भारतीय खेळाडू आक्रमक नव्हते, पण आता परिस्थिती बदलली आहे, असं म्हणत गिलने ऑस्ट्रेलियाला इशारा दिला आहे.
'प्रत्येक खेळाडूचा स्वभाव वेगळा असतात. काही जण लगेच प्रत्युत्तर देतात. मी जास्त आक्रमकही नाही आणि जास्त शांतही नाही. ऑस्ट्रेलियाच्या बॉलरनी जर आम्हाला बाऊन्सर टाकण्याची रणनीती बनवली, तर त्यासाठी आम्ही तयार आहोत. बाऊन्सरचा सामना करण्यासाठी आमच्याकडे बरेच पर्याय आहेत,' अशी प्रतिक्रिया गिलने दिली.