IND vs AUS : अशी जिंकणार मॅच? भारताची खराब फिल्डिंग, हातातले दोन कॅच सोडले, पाहा VIDEO
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताने (India vs Australia) खराब फिल्डिंग केली आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांनी मार्नस लाबुशेन याचे दोन हातातले सोपे कॅच सोडले आहेत.
ऍडलेड, 18 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताने (India vs Australia) खराब फिल्डिंग केली आहे. ऑस्ट्रेलियाला सुरुवातीला दोन धक्के दिल्यानंतर भारताने मार्नस लाबुशेनचे (Marnus Labuschagne) दोन कॅच सोडले. भारताचा 244 रनवर ऑलआऊट झाल्यानंतर बुमराहने सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाला दोन धक्के दिले. मॅथ्यू वेड आणि जो बर्न्स यांना बुमराहने माघारी धाडलं, पण यानंतर मात्र भारताला खराब फिल्डिंगचा फटका बसला.
पहिल्या सत्राच्या शेवटी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ने बाऊंड्री लाईनवर मार्नस लाबुशेनचा हातातला कॅच सोडला. इनिंगच्या 18 व्या ओव्हरचा पाचवा बॉल मोहम्मद शमीने बाऊन्सर टाकला. या बॉलवर लाबुशेनने पूल शॉट मारला, पण बाऊंड्रीवर उभ्या असलेल्या बुमराहला हा कॅच पकडता आला नाही आणि बॉल बाऊंड्रीच्या दिशेने गेला. बुमराहने कॅच सोडला तेव्हा लाबुशेन 12 रनवर खेळत होता.
यानंतर दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यानेही मार्नस लाबुशेनचा हातातला कॅच सोडला. बुमराहने टाकलेल्या 23व्या ओव्हरचा चौथा बॉल लाबुशेनने पुल मारण्याचा प्रयत्न केला, यात बॉल हवेत उडला, पण स्क्वेअर लेगवर उभ्या असलेल्या पृथ्वी शॉ याला हा कॅच पकडता आला नाही. त्यावेळी लाबुशेन 21 रनवर खेळत होता. यानंतर याच ओव्हरचा सहाव्या बॉल स्मिथच्या बॅटच्या कडेला बॉल लागला, पण स्लिपमध्ये उभ्या असलेल्या फिल्डरपासून बॉल थोडा लांब पडला.
लाबुशेन हा मागच्या वर्षभरापासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे त्याला मिळालेली ही दोन जीवनदानं भारतासाठी अडचणीची ठरू शकतात. ही सीरिज सुरू होण्याआधी सचिन तेंडुलकर यानेही लाबुशेन भारताला धोकादायक ठरू शकतो, असा इशारा दिला होता.
लाबुशेनने 14 टेस्ट मॅचमध्ये त्याने 63.43 च्या सरासरीने 1,459 रन केले, यामध्ये 4 शतकं आणि 8 अर्धशतकांचा समावेश आहे. टेस्ट क्रिकेटमधला त्याचा सर्वाधिक स्कोअर 215 एवढा आहे.