कॅनबेरा, 5 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) च्या डोक्याला झालेल्या दुखापतीवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनीही जडेजाच्या दुखापतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. कनकशन सबस्टिट्यूटच्या नियमानुसार युझवेंद्र चहलला टीममध्ये घेण्यात आलं, पण हे नियमाचं उल्लंघन होतं, असं मत संजय मांजरेकर यांनी मांडलं आहे. या मॅचमध्ये चहलने 3 विकेट घेऊन भारताला विजय मिळवून दिला.
सोनी सिक्सवर मांजरेकर यांनी कॉमेंट्री करताना जडेजाच्या दुखापतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. जडेजाच्या डोक्याला बॉल लागला तेव्हा टीम इंडियाचे फिजियो मैदानात का नाही पोहोचले? असा प्रश्न मांजरेकर यांनी उपस्थित केला. 'याप्रकरणात प्रोटोकॉल तोडण्यात आला, मॅच रेफ्री या मुद्द्यावरुन टीम इंडियाला नक्कीच प्रश्न विचारतील. बॅट्समनच्या डोक्याला बॉल लागत असेल, तर टीमचा फिजियो लगेच मैदानात येऊन बॅट्समनची दुखापत बघतो आणि प्राथमिक उपचार करतो. खेळाडूला कसं वाटत आहे, हेदेखील फिजियो विचारतो, पण असं काहीही झालं नाही. अजिबात वेळ न घालवता मॅच सुरू राहिली,' असं वक्तव्य मांजरेकर यांनी केलं.
विश्वसनीयतेवर प्रश्न
'जडेजाने यानंतर फक्त 9 रन केले, याचा मोठा फायदा झाला नाही. बॉल लागल्यानंतर कमीत कमी दोन ते तीन मिनीटांमध्ये भारताची मेडिकल टीम मैदानात यायला पाहिजे होती, असं झालं असतं तर ही दुखापत विश्वसनीय दिसली असती,' असं मांजरेकर म्हणाले.
टॉम मुडींनीही विचारले प्रश्न
माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू टॉम मुडी यांनीही जडेजाच्या दुखापतीवर संशय व्यक्त केला, तसंच फिजियो उपचार करायला का आला नाही?, असा प्रश्न मुडी यांनी विचारला. 'जडेजाचा पर्याय म्हणून चहलच्या मैदानात येण्यावर मला काहीही आक्षेप नाही, पण जडेजाच्या हेल्मेटला बॉल लागला, तेव्हा डॉक्टर आणि फिजियो मैदानात का आले नाहीत?,' असं टॉम मुडी म्हणाले.
ऑस्ट्रेलियन प्रक्षिकाचा मॅच रेफ्रीशी वाद
कनकशन सबस्टिट्युटच्या या मुद्द्यावरुन ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लॅन्गर यांनीही आक्षेप घेतले. याबाबत त्यांनी मॅच रेफ्री डेव्हिड बून यांच्याशी वाद घातला.