मेलबर्न, २६ डिसेंबर २०१८- तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या नाकीनऊ आणले. भारताने ८९ षटकांत दोन गडी गमावत २१५ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला पहिला सामना खेळणाऱ्या मयंक अग्रवालने ७६ धावा केल्या. तर दिवस संपताना चेतेश्वर पुजारा ६८ आणि विराट कोहली ४७ धावांवर खेळत आहेत. भारताने मयंक अग्रवाल आणि हनुमा विहारी या दोन विकेट गमावल्या. या दोन्ही विकेट पॅट कमिन्सने घेतल्या.
अग्रवालने अवघ्या ९५ चेंडूत आपल्या करिअरचं पहिलं अर्धशतक पूर्ण केलं. तो पदार्पणाच्या कसोटी सामन्यात अर्धशतक ठोकणारा भारताचा सातवा खेळाडू झाला. याआधी शिखर धवन (१८७), पृथ्वी शॉ (१३४), केसी इब्राहिम (८५) गावस्कर (६५), अरुण लाल (६३) आणि दिलावर हुसैन (५९) यांनी ही कामगिरी केली आहे.
पहिल्या विकेटसाठी मयंक- हनुमाने केल्या ४० धावा, ऑस्ट्रेलियामध्ये ही कामगिरी करणारी ठरली पहिली जोडी
बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतासाठी हनुमा विहारी आणि मयंक अग्रवालने सलामीवीर जोडीची जबाबदारी सांभाळली. सलामीवीर जोडी म्हणून दोघांचा हा पहिलाच सामना होता. तसेच ऑस्ट्रेलियामध्ये असं करणारी ही पहिली भारतीय जोडी ठरली आहे. मयंक आणि विहारीने भारताला ४० धावांची चांगली सुरुवात करुन दिली होती. मात्र पॅट कमिन्सने हनुमा विहारीला (८) एरॉन फिंचकरवी झेल बाद केले.
मेलबर्नमध्ये या जोडीने १८.५ षटकांपर्यंत फलंदाजी केली. जुलै २०११ नंतर दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्युझीलँड आणि ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय सलामीवीरांचं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे. डिसेंबर २०१० मध्ये गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवागने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन मैदानात २९.३ षटकं खेळली होती.
भारताला टी-ब्रेकआधी दुसरा धक्का बसला. भारताचा सलामीवीर मयंक अग्रवाल झेल बाद झाला. पॅट कमिन्सने त्याला बाद केले. मयंकने १६१ चेंडूत ७६ धावा केल्या. मयंकच्या या कामगिरीमुळे भारताने टी- ब्रेकपर्यंत २ गडी गमावत १२३ धावा केल्या. टी- ब्रेकनंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा बाजू सांभाळत आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॉक्सिंग डे टेस्टमध्ये भारताची सलामीची जोडी म्हणून मयंक अग्रवाल आणि हनुमा विहारी मैदानात उतरले. मात्र हनुमा अवघ्या ८ धावा करुन तंबूत परतला. पॅट कमिन्सने त्याला बाद केले.
‘लेडी लक’ने बदललं नशीब, पहिल्याच सामन्यात ठोकले अर्धशतक
'बॉक्सिंग डे'ने मेलबर्न क्रिकेट मैदानात सुरू झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसऱ्या कसोटी सामन्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. चार सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ १ -१ अशा बरोबरीत आहेत. या सामन्यातील विजयामुळे फक्त मालिकेत स्थान घट्ट होणार असं नाही तर २०१८ वर्षाचा शेवट विजयाने केला ही मानसिकता खेळाडूंना पुढील सामन्यांसाठी उपयुक्त ठरेल. एडिलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारताने सामना जिंकला तर पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाने जसंच्या तसं उत्तर देत मालिकेत आपलं अस्तित्व टिकवून धरलं. तिसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघ आत्मविश्वासाने मैदानात उतरले आहेत.
भारताने सामन्याच्या एक दिवसआधी आपला संघ घोषित केला. कर्णधार विराट कोहलीने केएल राहुलच्याजागी मयंक अग्रवालला संधी दिली. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातून मयंकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. मयंकसोबत सलामीवीर म्हणून सहाव्या स्थानावर फलंदाजी करणाऱ्या हनुमाला सलामीवीर म्हणून पाठवण्यात आले.
India vs Australia 3rd Test- मयंक अग्रवालची फलंदाजी पाहायला सकाळी ५ वाजताच उठली बॉलिवूडची 'ही' स्टार
कोहलीने केएल राहुल आणि मुरली विजय या सलामीवीर जोडीला त्यांच्या खराब फॉर्ममुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात न खेळवण्याचा मोठा निर्णय घेतला. याशिवाय रोहित शर्माला संघात घेण्यात आले आहे. तो विहारीच्या स्थानावर म्हणजे सहाव्या क्रमांकावर खेळेल. संघात एक अजून बदल करण्यात आला आहे. तिसऱ्या सामन्यासाठी रविंद्र जडेजाला संधी देण्यात आली आहे. उमेश यादवच्या जागी रविंद्रला संघात स्थान देण्यात आलं आहे. भारताने पर्थमध्ये चार जलदगती गोलंदाजांना खेळवले होते. भारताची ही रणनीती उलटी पडली होती. यामुळेच जडेजाला संधी देण्याचा निर्णय मॅनेजमेंटने घेतला.
गेल्या दोन्ही सामन्यात संघाची फलंदाजी कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराच्या अवती- भवतीच फिरत होती. रहाणेने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, इतर फलंदाजांना त्यांची जबाबदारी उचलावी लागेल. या तिघांशिवाय भारतीय फलंदाजांच्या बॅटमधून धावा निघणं संघासाठी अत्यंत आवश्यक आहे. मायदेशात मालिका जिंकण्यासाठी उतावीळ असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने टीममध्ये एक बदल केला आहे. खराब फॉर्ममध्ये असलेल्या पीटर हँड्सकॉम्बएवजी अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शला संघात स्थान देण्यात आले आहे.
या सामन्यातही पुन्हा एकदा सगळ्यांच्या नजरा ऑफ स्पिनर नाथन लॉयनवरच असणार आहेत. पर्थ कसोटी सामन्यात भारताला हरवण्यात नाथनची मुख्य भूमिका होती. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर मार्कस हॅरि, एरॉन फिंच यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. उस्मान ख्वाजाही चांगल्या फॉर्ममध्ये आहे.
भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलियाचा संघ- एरॉन फिंच, मार्कस हॅरिस, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, ट्रेविस हेड, मिचेल मार्श, टिम पेन, पॅट कमिंस, मिचेल स्टार्क, नाथन लायन आणि जोश हेजलवुड.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.