Home /News /sport /

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या Channel 7 ची कोर्टात धाव, BCCI वरही केले आरोप

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या Channel 7 ची कोर्टात धाव, BCCI वरही केले आरोप

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांचातल्या सीरिजदरम्यान अनेकवेळा वाद पाहायला मिळतात, यावेळीही असाच एक वाद समोर आला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया (Cricket Australia) आणि Channel 7 यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

    सिडनी, 1 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांचातल्या सीरिजदरम्यान अनेकवेळा वाद पाहायला मिळतात, यावेळीही असाच एक वाद समोर आला आहे, पण यावेळी खेळाडू नाही तर क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि Channel 7 यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार Channel 7 क्रिकेट ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोर्टात गेलं आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड बीसीसीआयला घाबरत असल्याचा आरोप Channel 7 कडून करण्यात आला आहे. सिडनी मॉर्निंग हेराल्ड या वृत्तपत्राशी बोलताना Channel 7 च्या अधिकाऱ्यांनी आपण कोर्टात गेल्याचं मान्य केलं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बीसीसीआयच्या हिताचा निर्णय घेऊन सीरिजचा कार्यक्रम बदलला आणि प्रसारण कराराचं उल्लंघन केलं, असा आरोप Channel 7 कडून करण्यात आला आहे. Channel 7 आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया आमने-सामने सेव्हन वेस्ट मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स वारबर्टन म्हणाले, 'क्रिकेट ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध वनडे आणि टी-20 मॅचऐवजी डे-नाईट टेस्टपासून दौऱ्याची सुरुवात करायची होती. आता ही टेस्ट ऍडलेडमध्ये 17 डिसेंबरला होईल. प्रसारक म्हणून क्रिकेट ऑस्ट्रेलिया आमचा सन्मान करत नाही, हे लाजीरवाणं आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया बीसीसीआयला घाबरतं.' 'क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अधिकारी बीसीसीआय आणि ऑस्ट्रेलियातले दुसरे प्रसारक फॉक्सटेलच्या मर्जीने चालतात. दौऱ्याच्या कार्यक्रमाला अंतिम रूप देण्याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलिया, बीसीसीआय, फॉक्सटेल आणि स्थानिक सरकारचे अधिकारी यांचे ई-मेल आम्हाला बघायचे आहेत,' अशी मागणी चॅनलने केली आहे. विराटच्या सुट्टीमुळेही चॅनलचं नुकसान विराट कोहली पितृत्वाच्या रजेसाठी पहिली टेस्ट मॅच झाल्यानंतर भारतात परतणार आहे, त्यामुळे चॅनल 7 चं मोठं नुकसान होणार आहे, तर त्यांचे प्रतिस्पर्धी चॅनल फॉक्स स्पोर्ट्सचा फायदा झाला आहे. चॅनल 7 कडे चार टेस्ट मॅचच्या प्रसारणाचे हक्क आहेत. यातली फक्त एकच टेस्ट विराट खेळणार आहे. तर फॉक्स स्पोर्ट्सकडे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातली वनडे आणि टी-20 सीरिज प्रसारित करण्याचे अधिकार आहेत. या दोन्ही सीरिजमध्ये विराट खेळणार आहे. दोन्ही चॅनलनी विराटवरच संपूर्ण सीरिजचे प्रोमो बनवले होते, पण विराटच्या सुट्टीमुळे चॅनल 7 ला आर्थिक नुकसान होणार असल्याचं बोललं जात आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या