कॅनबेरा, 4 नोव्हेंबर : विराट कोहली (Virat Kohli) हा जगातला सर्वोत्तम बॅट्समन असला, तरी त्याच्या कर्णधारपदावर कायमच प्रश्न उपस्थित केले जातात. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर विराटवरची टीका आणखी वाढली आहे. यानंतर आता पहिल्या टी-20 साठी विराटने निवडलेल्या टीमवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली पहिली टी-20 कॅनबेराच्या मनुका ओव्हलमध्ये आहे. भारताने तिसरी वनडे जिंकल्यानंतर विराट टी-20 साठी टीममध्ये फार बदल करणार नाही, अशी अपेक्षा होती, पण त्याने तब्बल 5 खेळाडू बदलले.
कोहलीने या मॅचसाठी टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर, मनीष पांडे, संजू सॅमसन आणि मोहम्मद शमी यांना संधी दिली. सुंदर, मनिष आणि सॅमसन या दौऱ्यातली पहिलीच मॅच खेळत आहेत, तर नटराजन आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. शमीला पहिल्या दोन वनडेमध्ये खेळवल्यानंतर तिसऱ्या वनडेमध्ये त्याच्याऐवजी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली होती. त्या मॅचमध्ये शार्दुल ठाकूरने उल्लेखनीय कामगिरी केली होती आणि भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती.
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर अजित आगरकर (Ajit Agarkar) याने मात्र टीम निवडीबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. भारताने 6 बॅट्समन घेऊन खेळण्याचा निर्णय योग्य आहे, पण युझवेंद्र चहलला टीममध्ये न बघून हैराण झाल्याचं आगरकर म्हणाला. 'चहल का बाहेर आहे, ते मला माहिती नाही. तो अनफिट आहे का फॉर्ममध्ये नाही, म्हणून त्याला बाहेर केलं? कारण काहीही असो, चहल टीममध्ये नसणं आश्चर्यकारक आहे,' अशी प्रतिक्रिया आगरकरने दिली.
भारतीय टीम
शिखर धवन, केएल राहुल, विराट कोहली, मनिष पांडे, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, मोहम्मद शमी, टी नटराजन
ऑस्ट्रेलियाची टीम
डीआरसी शॉर्ट, एरॉन फिंच, मॅथ्यू वेड, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॉईसेस हेनरिक्स, मिच स्वेपसन, सीन एबॉट, मिचेल स्टार्क, एडम झम्पा, जॉस हेजलवूड