Home /News /sport /

IND vs AUS : टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाची विजयी 'सलामी'

IND vs AUS : टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाची विजयी 'सलामी'

डेविड वॉर्नर आणि अॅरोन फिंच विराट सेनेवर पडले भारी

    मुंबई, 14 जानेवारी : भारताविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर दणदणीत विजय मिळवलाय. डेविड वॉर्नर आणि अॅरोन फिंच या जोडीने तडाखेबाज शतकी खेळी करून विजयी सलामी दिली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर तीन एकदिवसीय सामन्यापैकी पहिला सामना खेळवण्यात आला. पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत भारताला आपल्या मायभूमीत पराभूत केलं. भारताने दिलेल्या 256 धावांचं माफक आव्हान ऑस्ट्रेलियाने नाबाद पार केलं. डेविड वॉर्नर आणि अॅरोन फिंचने भारतीय गोलंदाजाची धुलाई करत शतकं झळकावली. डेविड वॉर्नरने 112 चेंडूत 17 चौकार आणि3 षटकार लगावत नाबाद 128 धावा केल्या. तर अॅरोन फिंचनेही 114 चेंडूत 13  चौकार आणि 2 षटकार लगावत शतक पूर्ण केले. दोन्ही खेळाडूंच्या दमदार खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 37.4 व्या षटकात 258 धावा करून विजयाला गवसणी घातली. भारतीय गोलंदाजांनी प्रयत्नाची पराकाष्टा केली पण यश मिळाले नाही. कुलदीप यादवने 10 षटकात सर्वाधिक 55 धावा दिल्यात त्यापाठोपाठ शार्दुल ठाकूरने अवघ्या 5 षटकात 43 धावा दिल्यात. ऑस्ट्रेलियाने पहिला एकदिवसीय सामना खिश्यात घालून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्याआधी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला पहिले फलंदाजी करण्यासाठी निमंत्रण दिलं. फलंदाजासाठी मैदानात उतरलेली सलामी जोडी रोहित शर्मा आणि शिखर धवनची जोडी फार कमाल करू शकली नाही. रोहित शर्मा अवघ्या 10 धावा करून बाद झाला. त्यानंतर केएल राहुल 47 तर शिखर धवन 74 धावा करून टीम इंडियाची बाजू सांभाळली. शिखर धवनने 91 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकार लगावत 74 धावांची खेळी केली. तर केएल राहुलने 61 चेंडूत 4 चौकार लगावत 47 धावा केल्यात. अवघ्या 3 धावांनी राहुलचे अर्धशतक हुकले. त्यानंतर टीम इंडियाची कमान सांभाळण्यासाठी आलेल्या कर्णधार विराट कोहली 16 धावा करून माघारी परतला. विराट बाद झाल्यानंतर टीम इंडियाचा कोणताही खेळाडू मोठा स्कोअर उभा करू शकला नाही. ऋषभ पंत 28 धावा तर रवींद्र जडेजा 25 धावांची खेळी करून बाद झाले. त्यानंतर एक-एक करून खेळाडू बाद होत गेले. 49.1 षटकात सर्व बाद 255 धावांचा स्कोअर भारताने उभा केला. भारताचा संघ : शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह. ऑस्ट्रेलिया संघ : डेविड वॉर्नर, अॅरोन फिंच, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, अॅश्‍टन टर्नर, अलेक्स कॅरी, अॅश्टन अॅगर, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, केन रिचर्डसन, अॅडम झाम्‍पा​
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Ind vs aus

    पुढील बातम्या