दुबई, 31 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020) सुरु असतानाच मुंबई (Mumbai Indians)चा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma)ला दुखापत झाली. पंजाबविरुद्धच्या मॅचवेळी रोहितच्या मांडीचा स्नायू दुखावला गेला, त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्माची निवड झाली नाही. पण रोहित शर्मा नेटमध्ये सराव करताना दिसल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. यानंतर आता बीसीसीआय (BCCI)ने रोहित शर्माबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
रविवारी बीसीसीआयची मेडिकल टीम रोहित शर्माची तपासणी करणार आहे, यानंतरच त्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या निवडीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे. यासंबंधीची माहिती असणाऱ्या बीसीसीआयमधल्या सूत्राने हे सांगितल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे.
बीसीसीआयची मेडिकल टीम रोहित शर्माला थोडसं अंतर भरदाव वेगाने धावायला लावेल (स्प्रिन्ट). यामध्ये रोहितला त्याच्या धावण्याचा वेग वाढवायला सांगितला जाईल (एक्सलरेशन) आणि धावताना मध्येच त्याला थांबवलं जाईल (डिक्सलरेशन). मांडीच्या स्नायूला दुखापत झाली असताना याच गोष्टींचा तपास केला जातो, असं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं.
बीसीसीआयच्या मेडिकल टीमने तपासणी केल्यानंतर रोहित किती फिट आहे ते पाहिलं जाईल आणि मग त्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या निवडीबाबतचा निर्णय घेतला जाईल.
'ग्रेड-2 टियर नसलेल्या दुखापतीमध्ये खेळाडूला शॉट मारताना किंवा चालताना त्रास होत नाही, पण जलद धावताना आणि रन काढताना त्रास होतो. त्यामुळे रविवारी रोहितला मॅचमध्ये रन काढतो, तशाच पद्धतीने पळवलं जाईल. एक रन काढल्यानंतर खेळाडू क्रिजमध्ये पोहोचतो आणि थांबतो, तसंच लगेच दुसऱ्या रनसाठी पुन्हा धावायला सुरूवात करतो. याच पद्धतीने मांडीच्या स्नायूच्या दुखापतीची तपासणी केली जाते', असं बीसीसीआय अधिकारी म्हणाले.
पोलार्डने दिली रोहितच्या दुखापतीबाबत माहिती
रोहितच्या अनुपस्थितीमध्ये मुंबईचं नेतृत्व कायरन पोलार्डकडे देण्यात आलं आहे. दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये विजय मिळवल्यानंतर पोलार्डने रोहितच्या दुखापतीबाबत माहिती दिली. रोहितची दुखापत दिवसेंदिवस बरी होत चालली आहे, त्यामुळे तो लवकरच मैदानात उतरेल अशी आशा आहे. आम्हीही त्याच्या पुनरागमनासाठी उत्सुक आहोत, असं पोलार्ड म्हणाला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहितची निवड झाली नसल्यामुळे त्याच्याऐवजी केएल राहुलला वनडे आणि टी-20 सीरिजसाठी उपकर्णधार करण्यात आलं आहे.