मुंबई, 27 जानेवारी : कोरोना व्हायरसचा (Covid 19) धोका लक्षात घेऊन न्यूझीलंड क्रिकेटनं (New Zealand Cricket) गुरूवारी भारतीय महिला टीमच्या विरुद्धच्या वेळापत्रकात बदल केला आहे. आता या मालिकेतील सर्व सामने एकाच ठिकाणी क्विन्सटाऊनमध्येच होतील. भारतीय महिला टीम (Indian Women Cricket Team) सध्या न्यूझीलंडमध्येच आहे. यजमान टीम विरुद्ध टीम इंडिया 5 वन-डे आणि 1 टी20 सामना खेळणार आहे. नऊ फेब्रुवारीपासून ही मालिका सुरू होणार आहे.
महिला क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा मार्च आणि एप्रिल महिन्यात होणार आहे. या वर्ल्ड कपपूर्वी ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. यापूर्वी या मालिकेतील एकमेव टी20 सामना नेपियरमधील मॅकलीन पार्कमध्ये होणार होता. त्यानंतर दोन दिवसांनी त्याच ग्राऊंडवर पहिला वन-डे सामना नियोजित होता. त्यानंतरच्या दोन वन-डे मॅच नेल्सनमध्ये तर शेवटच्या दोन क्विंन्सटाऊन ओव्हलमध्ये होणार होत्या. पण, या वेळापत्रकात आता बदल करण्यात आला आहे.
न्यूझीलंड क्रिकेटनं दक्षिण आफ्रिकेच्या पुरूष टीम विरुद्धच्या मालिकेतही बदल केला आहे. आता आफ्रिकेची टीम दौऱ्यातील संपूर्ण कालावधीमध्ये ख्राईस्टचर्चमध्येच राहणार आहे. न्यूझीलंड विरूद्ध दक्षिण आफ्रिका (New Zealand vs South Africa) यांच्यातील दोन्ही टेस्ट ख्राईस्टचर्चमधील हेगल ओव्हलवर होतील. यापूर्वी दुसरी टेस्ट वेलिंग्टनमध्ये होणार होती.
U19 World Cup : इंग्लंडची सेमी फायनलमध्ये धडक, वाचा कधी आहे भारत आणि पाकिस्तानची लढत
न्यूझीलंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी20 सामने नेपियरमध्ये होण्याची शक्यता आहे. तर नेदरलँड विरुद्धची एक वन-डे आणि एक टी20 सामना माऊंड मोनागानुई आणि दोन वन-डे सामने हॅमिल्टनमध्ये होतील. सर्व सामने पूर्वनियोजित तारखांनाच होतील. कोरोनाच्या काळात कमीत कमी प्रवास करण्यासाठी हा बदल करण्यात आल्याचे न्यूझीलंड क्रिकेटने स्पष्ट केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.