IND vs WI 2nd ODI : विंडीजविरुद्ध पंतनं गमावलेल्या संधीचं अय्यरनं केलं सोनं

भारताने दुसऱ्या सामन्यात विंडीजवर 59 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीसोबत श्रेयस अय्यरनं शतकी भागिदारी केली.

News18 Lokmat | Updated On: Aug 12, 2019 10:42 AM IST

IND vs WI 2nd ODI : विंडीजविरुद्ध पंतनं गमावलेल्या संधीचं अय्यरनं केलं सोनं

मुंबई, 12 ऑगस्ट : भारतानं विंडीजविरुद्धचा सामना 59 धावांनी जिंकला. या सामन्यात भारताकडून कर्णधार विराट कोहलीनं शतक तर श्रेयस अय्यरनं अर्धशतकी खेळी केली. याच्या जोरावर भारतानं विंडीजला 279 धावांचं आव्हान दिलं. त्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं 31 धावा देत 4 गडी बाद करून विंडीजची दाणादाण उडवली. पावसामुळं डकवर्थ लुईस नियमानुसार विंडीजला 46 षटकांत 269 धावांचे आव्हान देण्यात आलं होतं. त्यांना 210 धावांपर्यंत मजल मारता आली.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खराब झाली. शिखर धवन पहिल्याच षटकात बाद झाला. त्यानं फक्त दोन धावा केल्या. त्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी दुसऱ्या गड्यासाठी 74 धावांची भागिदारी केली. यात रोहित शर्माचा वाटा फक्त 18 धावांचा होता. रोहित बाद झाल्यानंतर अखेरच्या टी20 सामन्यात अर्धशतक करणाऱा ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याला मोठी धावसंख्या करण्यात अपयश आलं. पंत फक्त 20 धावा करून बाद झाला.

ऋषभ पंत बाद झाला तेव्हा भारताची अवस्था 3 बाद 101 अशी झाली होती. त्यावेळी विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी 125 धावांची भागिदारी केली. कोहली 120 धावा करून बाद झाला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या श्रेयस अय्यरनं अर्धशतकी खेळी केली. त्याने 68 चेंडूत 71 धावांची खेळी केली. यात त्यानं पाच चौकार आणि एक षटकार मारला. अय्यरने 100 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटनं धावा केल्या.

श्रेयस अय्यरच्या खेळीचं विराट कोहलीनं कौतुक केलं. भारताच्या आघाडीच्या फळीतील एखादा तरी फलंदाज मोठी खेळी करतो. पण या सामन्यात रोहित-धवन लवकर बाद झाले त्यानंतर मोठी खेळी करणं आणि संघाचा डाव सावरणं गरजेचं होतं. श्रेयसचा आत्मविश्वास चांगला आहे. त्याला कधी सिंगल-डबल घ्यायची आणि कधी मोठे फटके मारायचे हे माहिती आहे. त्याच्या फलंदाजीनं माझं काम सोपं झाल्याचं विराट कोहली म्हणाला.

भारताच्या चौथ्या क्रमांकाचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. पंतला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ब्रेथवेटनं क्लीन बोल्ड केले. त्याआधी वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या टी-20 सामन्यात पहिल्या दोन सामन्यात पंत अपयशी ठरला होता. त्याला दोन सामन्यात 0 आणि 4 धावात काढता आल्या होत्या. चौथ्या क्रमांकासाठी संघात घेतलेल्या ऋषभला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानं गमावलेल्या संधीचा फायदा श्रेयस अय्यरनं घेतला. अय्यरनं पाचव्या क्रमांकावर येत अर्धशतक केलं.

Loading...

श्रेयस अय्यर म्हणाला होता की, माझ्यासाठी एक युवा खेळाडू म्हणून संघात स्थान पक्क करणं महत्त्वाची गोष्ट आहे. एका वर्षाने संघात पुनरागमन केल्यानंतर ही बाब माझ्यासाठी मोठी आहे. यासाठी एका संधीची गरज असते आणि मला वाटतं की यावेळी मला संधी मिळेल आणि त्याचा फायदा घेईन. चौथ्या क्रमांकाबद्दल बोलतानाही तो म्हणाला होता की, व्यवस्थापनाचा निर्णय असेल की मला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं. सध्या त्या क्रमांकावर कोणाचंही स्थान निश्चित नाही. आता तरी त्याबद्दल मी विचार करत नाही. मला असा खेळाडू व्हायचं आहे जो कोणत्याही क्रमांकावर खेळू शकेल.

गौतम गंभीरनेसुद्धा टाइम्स ऑफ इंडियाला लिहलेल्या लेखात म्हटलं आहे की, भारताची मधल्या फळीतील फलंदाजीची डोकेदुखी कायम आहे. पहिला सामना पावसामुळं वाया गेला. त्रिनिदादमध्ये मात्र अय्यरला संधी मिळेल. तो मधल्या फळीत चांगली कामगिरी करेल कारण त्याच्याकडं योग्य रणनिती आहे. त्यानं कामगिरीत सातत्य राखावं हीच अपेक्षा असल्याचं गंभीर म्हणाला होता.

Special Report : कडक सॅल्युट! पुरात अडकलेल्यांसाठी देवदूत ठरलेल्या वर्दीतल्या 'बाप' माणसांचा VIDEO पाहून ऊर येईल भरून

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 12, 2019 09:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...