INDvsWI : पंतचा 'धोनी अवतार', विराटनं केलं कौतुक

INDvsWI : पंतचा 'धोनी अवतार', विराटनं केलं कौतुक

भारत आणि वेस्ट इंडीज दौऱ्याच पहिल्या टी20 सामन्यातच पंतने धोनीच्या पावलावर पाऊल टाकलं आहे.

  • Share this:

फ्लोरीडा, 03 ऑगस्ट : वेस्ट इंडीज दौऱ्यावर भारताचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतला धोनीच्या जागी संधी देण्यात आली आहे. यापुढे यष्टीरक्षणाची जबाबदारी पंतच्या खांद्यावर असेल असं निवड समितीनेच स्पष्ट केलं आहे. धोनीच त्याला मार्गदर्शन करेल असंही सांगितलं होतं. मात्र, सध्या धोनीच्या अनुपस्थितीत विंडीज दौऱ्यावर असलेल्या पंतनं पहिल्याच सामन्यात त्याची कमी भरून काढण्याचा प्रयत्न केला. याबद्दल त्याचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे.

विंडीजचे सर्व फलंदाज भारतीय माऱ्यासमोर ढेपाळले. एकट्या पोलार्डने डाव सावरला. त्याला अखेरच्या षटकात नवदीप सैनीनं पायचित केलं. खरंतर डीआरएस रिव्ह्यूमध्ये ती विकेट भारताला मिळाली. यामध्ये ऋषभ पंतने घेतलेला निर्णय यशस्वी ठरला.

अखेरच्या षटकात तिसऱ्या चेंडूवर सैनीचा फुलटॉस चेंडू थेट पॅडवर आदळला. यावेळी सैनीचं अपिल पंचांनी फेटाळून लावलं. त्यानंतर पंतने जोरदार अपिल करत कोहलीला डीआरएस घेण्यास सांगितलं. सीमारेषेवर असलेल्या कोहलीनं पंतच्या सांगण्यावरून डीआरएस घेतला आणि निर्णय भारताच्या बाजूने लागला.

तिसऱ्या पंचांनी जेव्हा मैदानावरील पंचांचा निर्णय बदलला. पोलार्ड 49 चेंडूत 49 धावा काढून बाद झाला. सैनी डीआरएस घेण्याबाबत साशंक होता. मात्र, पंतने ठामपणे डीआरएस घेण्याबद्दल कोहलीला सांगितले. डीआरएसचा निर्णय भारताच्या बाजूने आल्यानंतर कोहलीने सैनीला डिवचले तर पंतचे कौतुक केले.

डीआरएसबद्दल भारताचा माजी कर्णधार धोनीचा हात कोणीच धरू शकत नाही. त्याचं यष्टीरक्षण करतानाची चपळाई आणि अचूक नजर यामुळं अनेकदा सामना भारताच्या बाजूनं झुकला आहे. आता पंतने पहिल्याच सामन्यात अशी चुणूक दाखवल्यानं तोसुद्धा धोनीच्या पावलावर पाऊल टाकत असल्याची चर्चा रंगली आहे.

विडींजविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने 4 गडी राखून विजय मिळवला. विंडीजने दिलेलं 96 धावांचं आव्हान भारताने 17.2 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व राहिले. विंडीजला प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 बाद 95 धावा करता आल्या होत्या.

भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक 25 धावा केल्या. तर विराट कोहली आणि मनिष पांडे यांनी प्रत्येकी 19 धावा केल्या. दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या धवनला एक धाव काढता आली. ऋषभ पंतला खातंही उघडता आलं नाही. शेवटी वॉशिंग्टन सुंदर आणि रविंद्र जडेजाने नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला. जडेजाने 10 तर सुंदरने नाबाद 8 धावा केल्या.

भावी मुख्यमंत्री सेनेचा? पाहा काय आहे आदित्य ठाकरेंच्या मनात

Published by: Renuka Dhaybar
First published: August 4, 2019, 8:21 AM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading