मुंबई, 22 मे : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पाच टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची निवड आज (रविवारी) होणार आहे. आयपीएल स्पर्धेनंतर लगेच होणाऱ्या या मालिकेत टीम इंडियाच्या सिनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे. या आयपीएलमध्ये फिनिशर म्हणून जोरदार कामगिरी करणाऱ्या दिनेश कार्तिकची (Dinesh Karthik) या मालिकेसाठी निवड होऊ शकते.
3 वर्षांनी मिळणार संधी
दिनेश कार्तिकनं 2004 साली टीम इंडियात पदार्पण केलं. गेल्या 18 वर्षात तो सतत आत-बाहेर राहिला आहे. विकेटकिपर-बॅटर असलेल्या कार्तिकला महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) आगमनानंतर कायमच संधी मिळवण्यासाठी झगडावं लागलं आहे. त्याचबरोबर काही वेळा मिळालेल्या संधीचा फायदा उठवता न आल्यानं तो टीमच्या बाहेर गेला. भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात 2019 साली झालेल्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये कार्तिक खेळला होता. त्यानंतर तो गेल्या 3 वर्षांमध्ये एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.
गेल्या 3 वर्षांपासून टीम इंडियाच्या बाहेर असलेल्या कार्तिकनं या आयपीएल सिझनमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्यानं आत्तापर्यंत 14 सामन्यांत 191.33 च्या स्ट्राईक रेटनं 287 रन केले आहेत. आरसीबीनं दिलेली फिनिशरची भूमिका कार्तिक चोख बजावतोय. आरसीबीनं 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश करण्यात कार्तिकच्या आक्रमक बॅटींगचा मोठा वाटा आहे.
IPL 2022 : मुंबईनं मदत केल्यानंतरही RCB समोर खडतर आव्हान, 3 अडथळे करावे लागणार पार
टीम इंडियासाठी आयपीएलनंतरची प्रत्येक आंतरराष्ट्रीय टी20 मालिका ही आगामी टी20 वर्ल्ड कपची तयारी आहे. त्यामुळे एक अतिरिक्त विकेट किपर आणि फिनिशर म्हणून कार्तिक हा चांगला पर्याय निवड समितीसमोर आहे. दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाचा प्रमुख विकेट किपर ऋषभ पंतला विश्रांती देण्यात येणार असल्याचं वृत्त आहे. पंत आणि अन्य प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये मिडल ऑर्डरमध्ये अनुभवी खेळाडू म्हणून कार्तिकचा समावेश नक्की मानला जातोय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2022, South africa, Team india