मुंबई, 30 डिसेंबर : विराट कोहली (Virat Kohli) हा या वर्षातील सर्वात चर्चेतील क्रिकेटपटू आहे. त्याच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडिया टी20 वर्ल्ड कपमध्ये अपयशी ठरली. त्यानंतर त्याला वन-डे टीमच्या कॅप्टनसीवरुन हटवण्यात आले. दक्षिण आफ्रिकेत सध्या सुरू असलेल्या टेस्ट सीरिजमध्ये (India vs South Africa) विराट टीम इंडियाचं नेतृत्त्व करत आहे. सेंच्युरियनमध्ये सुरू असलेल्या या टेस्टमध्ये टीम इंडिया इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर आहे.
सेंच्युरियन टेस्टमध्ये टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 305 रनचे टार्गेट दिले आहे. या टार्गेटचा पाठलाग करताना आफ्रिकेची चौथ्या दिवसाअखेरीस 4 आऊट 94 अशी अवस्था आहे. आता शेवटच्या दिवशी भारतीय टीम विजयापासून 6 विकेट्स दूर आहे. या विकेट्स घेण्यात टीमला यश मिळाले तर टीम इंडिया सेंच्युरियनमध्ये इतिहास रचणार आहे. कारण, सेंच्युरियनचे पिच दक्षिण आफ्रिकेचा बालेकिल्ला मानले जाते.
या पिचववर आजवर फक्त ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या विदेशी टीमनी टेस्ट मॅच जिंकली आहे. या पिचवर पाकिस्ताननं 3, श्रीलंकेनं 5 आणि बांगलादेशनं 1 मॅच खेळली आहे, या सर्व टेस्टमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे सेंच्युरियनवर टेस्ट जिंकण्याची पहिली आशियाई टीम होण्याची टीम इंडियाला संधी आहे.
भारताने दिलेल्या 305 रनच्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात दुसऱ्या इनिंगमध्येही खराब झाली. एडन मार्करम एक रन करूनच आऊट झाला. तर कीगन पीटरसन 17 आणि रस्सी व्हॅन डर डुसेन 11 रन करून माघारी परतला. नाईट वॉचमन म्हणून बॅटिंगला आलेला केशव महाराज आऊट झाल्यानंतर दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. भारताकडून जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) 2 तर मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
IND vs SA : मोहम्मद सिराजचा मोठं रेकॉर्ड, शमी-बुमराहला टाकलं मागं
त्याआधी टीम इंडियाची दुसरी इनिंग 174 रनवर संपुष्टात आली. पहिल्या इनिंगमध्ये मिळालेल्या 130 रनच्या आघाडीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 305 रनचं आव्हान दिलं. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 34 रन केले. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडा आणि मार्को जेनसनला प्रत्येकी 4-4 विकेट घेण्यात यश आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, South africa, Team india