मुंबई, 22 नोव्हेंबर: टीम इंडियानं टी20 वर्ल्ड कप उपविजेत्या न्यूझीलंडचा टी20 सीरिजमध्ये (IND VS NZ T20 Series) 3-0 असा एकतर्फी पराभव केला. कोलकातामध्ये झालेली शेवटची मॅच देखील जिंकत भारतीय टीमनं ही कामगिरी केली. पूर्णवेळ कॅप्टन म्हणून रोहित शर्माची (Rohit Sharma) ही पहिलीच सीरिज होती. या सीरिजमध्ये विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजा या चार प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. तरीही भारतीय टीमनं प्रत्येक विभागात न्यूझीलंडपेक्षा चांगली कामगिरी केली. या विजयाचे 5 प्रमुख हिरो आहेत.
रोहित शर्मा (Rohit Sharma): रोहित शर्मानं कॅप्टन आणि बॅटर या दोन्ही भूमिका चोख बजावल्या. गेल्या सहा महिन्यांपासून क्रिकेट खेळत असलेल्या रोहितनं या सीरिजमध्ये जोरदार खेळ केला. त्यानं 3 मॅचमध्ये सर्वात जास्त 159 रन काढले. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश होता. या सीरिजमध्ये त्यानं 11 फोर आणि 10 सिक्स लगावले. त्यामुळे त्याला 'मॅन ऑफ द सीरिज' नं गौरवण्यात आले.
केएल राहुल (KL Rahul): केएल राहुलनं या सीरिजमध्ये रोहितला चोख साथ दिली. त्यानं 2 मॅचमध्ये 40 च्या सरासरीनं 80 रन काढले. राहुलनं रांचीमध्ये झालेल्या दुसऱ्या टी20 मध्ये 49 बॉलमध्ये 65 रन काढत विजयाचा पाया रचला. यावेळी त्यानं रोहितसोबत पहिल्या विकेटसाठी 117 रनची पार्टनरशिप केली. टी20 इंटरनॅशनलमध्ये पहिल्या विकेटसाठी सर्वात जास्त वेळा (5) शतकी पार्टनरशिप करण्याच्या बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या विक्रमाची रोहित-राहुल जोडीनं बरोबरी केली आहे.
आर. अश्विन (R. Ashwin) : अश्विननं टी20 वर्ल्ड कपमधील चांगला फॉर्म या सीरिजमध्येही कायम ठेवला. त्यानं टी20 वर्ल्ड कपमध्ये 6 विकेट्स घेतल्या होत्या. न्यूझीलंड विरुद्धही अश्विननं अचूक बॉलिंग करत मिडल ओव्हर्समध्ये त्यांच्या बॅटर्सना रोखून धरलं. अश्विननं 2 मॅचमध्ये 5. 25 च्या इकोनॉमी रेटनं 3 विकेट्स घेतल्या.
IND vs NZ: टीम इंडियातील नव्या हिटरला हिटमॅनचा सॅल्यूट, रोहितचा VIDEO VIRAL
अक्षर पटेल (Axar Patel): अक्षर पटेलनं त्याला मिळालेल्या संधीचा फायदा उठवला. त्यानं 3 मॅचमध्ये 6 च्या इकोनॉमी रेटनं 4 विकेट्स घेतल्या. अक्षरनं या सीरिजमध्ये प्रत्येक 16 बॉलमध्ये एक विकेट घेतली. कोलकातामधील विजयात तोच 'मॅन ऑफ द मॅच' ठरला.
हर्षल पटेल (Harshal Patel) : हर्षल पटेलनं या सीरिजमध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने पदार्पणातील मॅचमध्ये 25 रन देत 2 विकेट्स घेत 'मॅन ऑफ द मॅच' चा पुरस्कार पटकावला. कोलकातामध्येही त्यानं 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर त्यानं 11 बॉलमध्ये 18 रन देखील काढले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, New zealand, Team india