मुंबई, 11 नोव्हेंबर: टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ टी20 वर्ल्ड कपनंतर संपला आहे. त्यांच्या जागी राहुल द्रविडची (Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 17 नोव्हेंबपासून सुरू होणारी टी20 सीरिज द्रविडच्या कारकिर्दीमधील पहिली परीक्षा असेल. या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी द्रविडच्या सहकाऱ्यांची घोषणा बीसीसीआय लवकरच करणार आहे.
टीम इंडियाचे सध्याचे बॅटींग कोच विक्रम राठोड (Vikram Rathour) यांनी पुन्हा एकदा याच पदासाठी अर्ज केला असून त्यांना मुदतवाढ मिळणार हे नक्की आहे. त्यामुळे टीम इंडियाला आता नव्या बॉलिंग आणि फिल्डिंग कोचची प्रतीक्षा आहे. रवी शास्त्रींच्या कार्यकाळातील बॉलिंग कोच भरत अरूण आणि आर. श्रीधर यांनी पुन्हा अर्ज केलेला नाही. त्यामुळे या दोन्ही पदावर नव्या व्यक्तीची निवड होणार आहे.
'टाईम्स ऑफ इंडिया' तील वृत्तानुसार टी. दिलीप (T. Dilip) यांची टीम इंडियाचे फिल्डिंग कोच होणार आहेत. तर मुंबईचा माजूी फास्ट बॉलर पारस म्हांब्रे (Paras Mhambrey) बॉलिंग कोच असेल. दिलीप यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकदामीमध्ये (NCA) काम केलं आहे. त्याचबरोबर जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियासोबतही ते होते. दिलीप यांना अभय शर्मा यांचं आव्हान आहे. शर्मा यांनी इंडिया ए आणि अंडर-19 टीमसोबत काम केलं आहे.
IND vs NZ: टीम इंडियाच्या पराभवानंतर व्यंकटेश अय्यर पडला होता आजारी
मुंबईकर होणार बॉलिंग कोच
मुंबईकर पारस म्हांब्रेचं नाव बॉलिंग कोच पदासाठी सर्वात आघाडीवर आहे. 48 वर्षांचे पारस म्हांब्रे मागच्या 18 वर्षांपासून भारतात क्रिकेटच्या वेगवेगळ्या स्तरावर प्रशिक्षण देत आहे. 2015-16 साली राहुल द्रविड इंडिया ए आणि भारताच्या अंडर-19 टीमचा (Under 19 Team India) प्रशिक्षक होता, तेव्हा त्याने पारस म्हांब्रेंना बॉलिंग प्रशिक्षक होण्याची ऑफर दिली. पारस म्हांब्रे यांनीही द्रविडची ऑफर स्वीकारली. पुढे म्हांब्रे कोच असताना भारताने तीन वेळा अंडर-19 वर्ल्ड कपची फायनल गाठली, तर 2018 साली विजय मिळवला.
पारस म्हांब्रे सध्या अंडर-19 टीमचे प्रशिक्षक असून इंडिया-एच्या यंत्रणेमध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राहुल द्रविडचा सर्वात विश्वासू सहकारी अशीही म्हांब्रेची ओळख आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.