पुणे, 29 मार्च : शेवटपर्यंत रंगलेली भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील तिसरी वन-डे भारताने सात रनने जिंकली. या विजयासोबतच भारताने वन-डे मालिका देखील 2-1 अशा फरकाने जिंकली. या मालिकेनंतर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) याने वेळापत्रकावर नाराजी व्यक्त केली आहे.
काय म्हणाला विराट?
सध्याच्या परिस्थितीमध्ये वेळापत्रक तयार करताना विचार करायला हवा. बायो बबल्समध्ये (bio-bubbles) खेळणं ही अवघड गोष्ट आहे. प्रत्येकामध्ये ती मानसिक क्षमता असेलच असे नाही. या गोष्टीचा भविष्यात विचार होईल अशी मला खात्री आहे,' असं मत वन-डे मालिका 2-1 ने जिंकल्यानंतर विराटनं व्यक्त केलं.
भारतीय खेळाडूंनी मागील वर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेनंतर सातत्याने क्रिकेट खेळले आहे. आयपीएल स्पर्धा (IPL 2020) नोव्हेंबरमध्ये संपली. त्यानंतर लगेच भारतीय टीम ऑस्ट्रेलियात भरगच्च क्रिकेट दौऱ्यावर गेली होती. त्यानंतर घरच्या मैदानावर टीम इंडियानं इंग्लंडचा सामना केला. आता लगेच पुन्हा आयपीएल स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंना सज्ज व्हायचं आहे.
भारताने आयपीएल स्पर्धेनंतर आठ टेस्ट, सहा वन-डे आणि आठ टी-20 मॅच खेळल्या आहेत. या सततच्या क्रिकेटवरच विराटनं नाराजी व्यक्त केली आहे.
'मॅन ऑफ द मॅच', 'मॅन ऑफ द सीरिज' पुरस्कारावरही नाराजी
वन-डे सीरिजच्या शेवटच्या मॅचमध्ये सॅम करनला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तर 'मॅन ऑफ द सीरिज' पुरस्कारासाठी जॉनी बेअरस्टोची निवड झाली. या पुरस्करांसाठी अनुक्रमे शार्दुल ठाकूर आणि भुवनेश्वर कुमार यांची निवड व्हायला हवी होती, असं मत विराटनं मॅच संपल्यानंतर व्यक्त केलं.
( वाचा : IND vs ENG : पहिले 491 दिवस ते दुसरे 491 दिवस, विराटला नेमकं झालंय काय? )
वन-डे मालिकेतील विजयानंतर विराटने सांगितले की, ' शार्दुल ठाकूर 'मॅन ऑफ द मॅच' आणि भुवनेश्वर कुमार 'मॅन ऑफ द सीरिज' नाही याचं मला आश्चर्य वाटत आहे. या दोघांनी कठीण परिस्थितीमध्ये जबरदस्त बॉलिंग केली. शार्दुल ठाकूरने शेवटच्या वन-डे मध्ये 4 विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमारनं 10 ओव्हरमध्ये फक्त 42 रन देत 3 विकेट्स घेतल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england, Virat kohli