चेन्नई, 30 जानेवारी : भारतामध्ये गेल्या दहा वर्षात टेस्ट सीरिज जिंकणारी इंग्लंड (England) ही एकमेव विदेशी टीम आहे. इंग्लंडनं 2012-13 मध्ये टीम इंडियाचा (Team India) 2-1 नं पराभव केला होता. त्या दौऱ्यात ग्रॅमी स्वान आणि माँटी पानेसार या इंग्लंडच्या स्पिनर्सनी चांगली बॉलिंग केली होती. त्यावेळी भारताचा कॅप्टन असलेल्या महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) जेम्स अँडरसन हा दोन्ही टीममधील मुख्य फरक असल्याचं सांगितलं होतं. अँडरसननं त्या सीरिजमध्ये 12 विकेट्स घेतल्या होत्या.
या सीरिजमध्ये काय होणार?
श्रीलंकेविरुद्धची सीरिज 2-0 अशी जिंकत इंग्लंडची टीम भारतामध्ये दाखल झाली आहे. या विजयात अनुभवी जेम्स अँडरसननचा मोठा वाटा होता. अँडरसन चेन्नईमध्ये होणाऱ्या दोन टेस्टपैकी किमान एक टेस्ट खेळणार आहे. त्याचबरोबर इंग्लंडकडं स्टुअर्ट ब्रॉड हा आणखी एक अनुभवी फास्ट बॉलर आहे. जोफ्रा आर्चर आणि स्विंग बॉलिंग करु शकणाऱ्या बेन स्टोक्सच्या समावेशानं इंग्लंडची टीम मजबूत मानली जात आहे.
भारताकडं इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हा फास्ट बॉलिंगचा अटॅक आहे. त्याचवेळी रिव्हर्स स्विंग तज्ज्ञ मानले जाणारे मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि उमेश यादव (Umesh Yadav) या दोन फास्ट बॉलर्सची कमतरता टीम इंडियाला जाणावणार आहे. हे दोन्ही बॉलर ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये जखमी झाले होते. त्यामुळे पहिल्या दोन टेस्टसाठी त्यांचा टीममध्ये समावेश करण्यात आलेला नाही.
रिव्हर्स स्विंग निर्णयाक ठरणार?
भारत – इंग्लंड सीरिजमध्ये रिव्हर्स स्विंगची भूमिका महत्त्वाची ठरेल, असं मत इंग्लंडचे बॅटिंग कोच ग्रॅहम थोर्पे यांनी व्यक्त केलं आहे. पहिल्या सत्रात पिच स्पिनर्सना मदत करण्याची शक्यता नाही, त्यामुळे फास्ट बॉलर्स निर्णायक ठरतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
भारताचा माजी फास्ट बॉलर मनोज प्रभाकर हे रिव्हर्स स्विंग स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जात. ‘इंग्लंडच्या टीममध्ये अँडरसनची उपस्थिती आणि टीम इंडियाच्या टीममध्ये शमी आणि यादवच्या अनुपस्थितीमुळे ही सीरिज भारतासाठी सोपी नसेल’, असं भाकित प्रभाकर यांनी व्यक्त केलं आहे. सिराजबद्दल मला फारशी माहिती नाही, पण शमी आणि यादव हे दोघंही याबाबत खूप अनुभवी आहेत, असं प्रभाकर यांनी स्पष्ट केलं.
इंग्लंडच्या टीमनं यापूर्वी 2016 साली भारताचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात शमी आणि यादव या दोघांनीही प्रत्येकी 18 विकेट्स घेतल्या होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket