मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG: टीम इंडियाला मालिका सुरु होण्यापूर्वीच मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू आऊट!

IND vs ENG: टीम इंडियाला मालिका सुरु होण्यापूर्वीच मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू आऊट!

मुंबई, 21 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाला (India vs Australia) दुखापतींचं ग्रहण लागलं होतं. भारतानं ऑस्ट्रेलियात मालिका जिंकली. भारतीय खेळाडू मायदेशी परतले, तरीही हे ग्रहण संपलेलं नाही. या दुखापतीमुळे टीम इंडियातील एक महत्त्वाचा खेळाडू भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) मालिकेतून आऊट झाला आहे. त्यामुळे भारतीय टीमला ही मालिका सुरु होण्यापूर्वीच धक्का बसला आहे.

कोणता खेळाडू झाला आऊट?

भारतीय टीमचा सध्या फॉर्मात असलेला ऑल राऊंडर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. सिडनी टेस्टच्या दरम्यान जडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्याच्या अंगठ्याची सर्जरी करण्यात आली आहे. जडेजाला बरं होण्यासाठी किमान सहा आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. इंग्लंड विरुद्धची चार कसोटींची मालिका 5 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. आर. अश्विन सोबत जडेजाची जोडी भारतीय खेळपट्टीवर नेहमीच प्रभावी ठरली आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीचा टीमला मोठा फटका बसणार आहे.

भारत दौऱ्यात इंग्लंडची टीम चार टेस्ट, पाच टी 20 आणि तीन वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिल्या दोन टेस्ट चेन्नईमध्ये तर त्यानंतरच्या दोन टेस्ट अहमदाबादमध्ये होणार आहे. वन-डे आणि टी-20 मालिकेतील जडेजाच्या खेळण्याबाबतचा निर्णय हा नंतर घेतला जाणार आहे.

रविंद्र जडेजा याच दुखापतीमुळे ब्रिस्बेनमध्ये झालेली शेवटची टेस्ट खेळू शकला नव्हता. त्याचबरोबर इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दोन टेस्टसाठी त्याची निवड झाली नव्हती. सध्या तो बंगळुरुतील नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये पुढील उपचार घेत आहे.

जडेजाच्या जागी कुणाला संधी?

रविंद्र जडेजाच्या जागी भारतीय टीममध्ये अक्षर पटेलला (Axar Patel) संधी देण्यात आली आहे. अक्षर हा देखील जडेजाप्रमाणे डाव्या हातानं बॉलिंग करतो. तसंच तो चांगली बॅटिंग करण्यासही सक्षम आहे.

पहिल्या दोन टेस्टसाठीची भारतीय टीम

विराट कोहली (कॅप्टन),  शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, के.एल. राहुल अजिंक्य रहाणे, मयंक अगरवाल, ऋद्धीमान साहा, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, आर.अश्विन, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल.

First published:
top videos

    Tags: Cricket, Ravindra jadeja