चेन्नई, 14 फेब्रुवारी : भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील दुसरी टेस्ट चेन्नईत सुरु आहे. पहिल्या टेस्टमध्ये झालेल्या मोठ्या पराभवानंतर या टेस्टवर टीम इंडियानं भक्कम पकड बसवली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी भारताचा पहिला डाव फार काळ चालला नाही. पहिल्या दिवसाच्या धावसंख्येत फक्त 29 रनची भर घालून उरलेले चार बॅट्समन परतले.
पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडनं धावांचा डोंगर उभा केला होता. दुसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडचे बॅट्समन साफ अपयशी ठरले. त्यांची संपूर्ण टीम फक्त 134 रनवर संपुष्टात आली. भारतीय स्पिनर्सच्या भेदक बॉलिंगपुढे इंग्लंडची टीम संपूर्ण दिवसभर बॅटिंग करु शकली नाही. भारताकडून आर. अश्विननं (R. Ashwin) सर्वात जास्त 5 विकेट्स घेतल्या. इंग्लंडकडून बेन फोक्सनं (Ben Foakes) सर्वात जास्त 42 रन काढत फॉलो ऑनची नामुष्की टाळली.
मोदींनी पाहिली मॅच
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) रविवारी चेन्नईत होते. त्यांनी 118 हायटेक अर्जुन रणगाडे सैन्याला सोपवले. त्याचबरोबर अनेक योजनांच्या कामांचा शुभारंभ केला. मोदींचं हेलिकॉप्टर जेव्हा चेन्नईच्या क्रिकेट स्टेडियमच्या जवळून गेलं त्यावेळी त्यांनी आकाशातूनच टेस्ट मॅच पाहिली. मोदींनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन मॅचचा एक खास फोटो देखील शेअर केला आहे.
या फोटोत पांढऱ्या कपड्यात खेळणारे खेळाडू दिसत असून स्टेडियम जवळून जाणारा चेन्नई मेट्रोचा मार्गही दिसत आहे. क्रिकेट स्टेडियम आणि जवळपासच्या सुंदर परिसराचा उंचावरुन घेतलेला फोटो मोदींनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे.
Caught a fleeting view of an interesting test match in Chennai. pic.twitter.com/3fqWCgywhk
— Narendra Modi (@narendramodi) February 14, 2021
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार टेस्ट मॅचच्या या सीरिजमधील पहिल्या दोन टेस्ट चेन्नईत होत आहेत. तर नंतरच्या दोन टेस्ट अहमदाबादमध्ये होणार आहेत. या मालिकेत सध्या इंग्लंड 1-0 नं आघाडीवर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Pm narenda modi