चेन्नई, 05 फेब्रुवारी: भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पहिली टेस्ट सुरु होण्यापूर्वी टीम मॅनेजमेंटनं गुगली टाकला. भारतीय टीममध्ये अवघ्या दीड तासापूर्वी समावेश करण्यात आलेल्या शाहबाज नदीम (Shahbaz Nadeem) अंतिम 11 मध्ये समावेश करण्यात आला. अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाल्यानं नदीम आणि राहुल चहरचा (Rahul Chahar) शुक्रवारी सकाळीच भारतीय टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.
कुलदीपकडं पुन्हा दुर्लक्ष
नदीमचा अंतिम 11 मध्ये समावेश करत टीम मॅनेजमेंटनं भारताचा आणखी एक स्पिनर कुलदीप यादवकडं (Kuldeep Yadav) पुन्हा एकदा दुर्लक्ष केलं आहे. कुलदीप 2019 साली शेवटची टेस्ट खेळला आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सर्व प्रमुख बॉलर जखमी झाल्यानंतरही त्याला बेंचवरच बसावं लागलं होतं.
भारतीय पिचवर कुलदीपला खेळवण्याचे संकेत विराट कोहलीनं दिले होते. त्यानंतरही कुलदीपकडं दुर्लक्ष करण्यात आल्यानं अनेकांना आश्चर्य वाटलं आहे. टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीर (Gautam Gambhir) देखील त्यापैकी एक आहे.
(हे वाचा-IND vs ENG : ....म्हणून इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात उतरले)
कुलदीपला का काढलं?
'मनगटाच्या आधारे स्पिन बॉलिंग करु शकणाऱ्या दुर्मिळ बॉलरपैकी कुलदीप हा एक आहे. अलिकडच्या काळात त्याची बॉलिंग फारशी कुणी पाहिलेली नाही. इंग्लंडविरुद्ध त्याचा समावेश व्हायला हवा होता. यावेळी कुलदीप हा दुर्देवी ठरला आहे,' असं मत गंभीरनं ‘क्रिकबझ’शी बोलताना व्यक्त केलं. ‘सातव्या आणि आठव्या नंबर पर्यंत बॅटिंग करु शकणारे खेळाडू टीम मॅनेजमेंटला हवे असतील त्यामुळेच कदाचित कुलदीपला वगळण्यात आलं,' असा अंदाज गंभीरनं व्यक्त केला आहे. त्याचबरोबर गेल्या काही महिन्यांपासून टेस्ट क्रिकेटपासून दूर असलेल्या इशांत शर्माच्या टीममधील समावेशाबाबतही गंभीरनं आश्चर्य व्यक्त केलं आहे.
(हे वाचा-इंग्लंडच्या बॅट्समननं ‘तो’ शॉट खेळला आणि 34 वर्षांपूर्वीची जखम झाली ताजी)
टीम इंडियात पाच बदल
ऑस्ट्रेलियाविरुद्धची ब्रिस्बेन टेस्ट गाजवणाऱ्या मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरचा टीममध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्यांच्या जागी जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा या दोन अनुभवी बॉलर्सची अंतिम 11 मध्ये निवड झाली आहे. आर. अश्विन आणि शाहबाज नदीम यांचा अनुक्रमे टी. नटराजन आणि नवदीप सैनीच्या जागी टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. अश्विन दुखापतीमुळे ब्रिस्बेन टेस्ट खेळू शकला नव्हता. तर, टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली परत आल्यानं मयांक अग्रवालला वगळण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket