चेन्नई, 05 फेब्रुवारी: भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पहिल्या टेस्टला चेन्नईमध्ये सुरुवात झाली आहे. या टेस्टच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी (Black Armbands) लावून मैदानात उतरले. इंग्लंडचे वॉर हिरो टॉम मूर (Tom Moore) यांचं मंगळवारी निधन झालं आहे. वयाच्या शंभराव्या वर्षी देखील इंग्लंडमधील कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) विरुद्ध लढाई लढणाऱ्या या प्रेरणादायी हिरोच्या स्मरणार्थ इंग्लंडचे खेळाडू दंडाला काळी पट्टी लावून मैदानात उतरले आहेत.
मॅच सुरु होण्यापूर्वी होणाऱ्या राष्ट्रगीताच्या वेळी इंग्लंड टीममधील सर्व खेळाडूंनी दंडाला काळी पट्टी बांधली होती. इंग्लंडचा कॅप्टन जो रुट (Joe Root) यानंही मूर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
काय म्हणाला रुट?
रुट त्याच्या करिययरमधील 100 वी टेस्ट सध्या खेळत आहे. त्याच्यासाठी असलेल्या या ऐतिहासिक दिवशी देखील रुट यांनी मूर यांच्या कार्याचं स्मरण केलं. 'ही अतिशय दु:खद बातमी आहे. मला या वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांच्याशी (मूर) बोलण्याची संधी मिळाली होती. ते एक महान वारसा सोडून गेले आहेत. या वारसाचा त्यांच्या कुटुंबाला नक्कीच अभिमान असेल. त्यांच्या कामामुळे या खडतर काळातही लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं होतं. नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) साठी त्यांनी मोठं योगदान दिलं आहे. संपूर्ण क्रिकेट टीमच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली वाहतो,’’ असं रुटनं यावेळी सांगितलं.
(हे वाचा-IND vs ENG : पहिल्या सत्रावर टीम इंडियाचं वर्चस्व, इंग्लंडला दोन धक्के)
कोण होते मूर?
निवृत्त कर्नल जॉन मूर यांनी इंग्लंडमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अतिशय मोठं कार्य केलं. त्यांनी वाढत्या वयाची पर्वा न करता कोरना व्हायरसचा सामना करण्यासाठी देशभरातून निधी गोळा केला. त्यांच्या पुढाकारानं ब्रिटनमधील हॉस्पिटलसाठी 4.5 कोटी डॉलर्सचा निधी गोळा झाला होता.
ब्रिटनमधील सर्वोच्च अशा 'नाइटहुड' सन्मानानंही त्यांचा गौरव करण्यात आला. मूर लष्करातून कॅप्टन या पदावरुन निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर केलेल्या कार्यामुळे कर्नल ही मानद पदवी त्यांना देण्यात आली. कोरोना व्हायरसमुळे मुर यांचं मंगळवारी निधन झालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket