सिडनी, 6 डिसेंबर: भारत विरुद्ध ऑस्ट्रलिया (IND vs AUS) यांच्यातील दुसरी टी 20 (T20) सुरु होण्यापूर्वी सिडनीमध्येच आणखी एक मॅच खेळण्यास भारतीय टीम (Team India) मैदानात उतरली. सिडनीमधील दुसऱ्या मैदानात भारत अ वि. ऑस्ट्रेलिया अ यांच्यात तीन दिवसांच्या सराव सामन्याला सुरुवात झाली आहे. या सराव सामन्यात मुंबईकर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) ने पहिल्या दिवसाखेर नाबाद शतक झळकावले. रहाणेच्या नाबाद 108 रन्समुळे भारत अ ने पहिल्या दिवसाखेर 8 आऊट 237 अशी मजल मारली.
यापूर्वी रहाणेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय सुरुवातीला फायदेशीर ठरला नाही. शुभमन गिल दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर आऊट झाला. त्यापाठोपाठ त्याचा सलामीचा सहकारी पृथ्वी शॉ आठ बॉल खेळून आऊट झाला.
आयपीएलपाठोपाठ ऑस्ट्रेलियातील पहिल्या सराव सामन्यातही पृथ्वी शॉ अपयशी ठरल्याने त्याचे टीममधील स्थान धोक्यात आले आहे. शुभमन गिलला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या वन-डे मध्ये संधी मिळाली होती. त्यामध्ये त्याने 33 रन काढले होते. टेस्ट टीममध्ये मयांक अग्रवालची जागा सलामीसाठी निश्चित मानली जात आहे. मयांकच्या जोडीदारासाठी पृथ्वी आणि शुभमन या तरुण खेळाडूंमध्ये चुरस आहे.
रहाणे-पुजाराने सावरले!
पृथ्वी आणि गिलपाठोपाठ हनुमा विहारी देखील 15 रन्सवर आऊट झाल्याने भारतीय टीमची अवस्था 3 आऊट 40 अशी झाली होती. त्यावेळी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या अनुभवी जोडीने टीमला सावरले. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 76 रन्सची भागिदारी केली. पॅटिन्सनने पुजाराला 54 रन्सवर आऊट करत ही जोडी फोडली. ऑस्ट्रेलियीविरुद्धच्या मागील मालिकेत पुजाराने भारताकडून सर्वात जास्त रन्स केले होते. आता या मालिकेतील पहिल्याच सराव सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले आहे.
पुजारा परतल्यानंतरही अजिंक्य रहाणेचा एका बाजूने संघर्ष सुरुच होता. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळालेली नाही. वृद्धीमान सहाला देखील खातं उघडण्यात अपयश आले. त्यापाठोपाठ आर. अश्विननही झटपट परतला. त्यानंतर रहाणेनं कुलदीप आणि उमेश यादवच्या मदतीने दिवस खेळून काढला. दिवसअखेर उमेश यादव 24 रन काढून रहाणेला साथ देत आहे.
या सराव सामन्यात भारताकडून मोहम्मद सिराज आणि कार्तिक त्यागी देखील खेळत आहेत. ऑस्ट्रेलिया अ टीमचं नेतृत्व ट्रेव्हिस हेड करत असून त्यांचा टेस्ट टीमचा कॅप्टन टीम पेन देखील हा सराव सामना खेळत आहे.