सिडनी, 9 डिसेंबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( IND vs AUS) यांच्यात झालेल्या वन-डे आणि टी 20 मालिकेमध्ये हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) ने जबरदस्त कामगिरी केली आहे. दुखापतीनंतर टीममध्ये परतलेल्या हार्दिकने वन-डे मालिकेत भारताकडून सर्वात जास्त रन्स केले. हार्दिकचा फॉर्म टी 20 सीरिजमध्ये देखील कायम होता. त्यामुळे त्याचा टेस्ट टीममध्ये समावेश करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने (Virat Kohli) हार्दिकच्या टेस्ट खेळण्यावर एक महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. “टेस्ट टीममध्ये खेळण्यासाठी हार्दिकने नियमित बॉलिंग करणे आवश्यक आहे’’, असे विराटने स्पष्ट केलं. ‘हार्दिकला फक्त बॅट्समन म्हणून टेस्ट टीममध्ये खेळवणार का?’ असा प्रश्न विचारल्यावर विराटने हे उत्तर दिलं.
काय म्हणाला विराट?
“हार्दिक सध्या बॉलिंग करु शकत नाही हे आम्हाला माहिती आहे. टेस्ट क्रिकेट हे वेगळे आव्हान आहे. त्यासाठी आम्हाला त्याच्या बॉलिंगची गरज आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमधील पिचवर टेस्ट खेळताना टीममध्ये संतुलन निर्माण करणारा खेळाडूची आम्हाला हवा आहे. हार्दिक पांड्या ज्या जागेवर क्रिकेट खेळतो त्या जागेवर खेळणाऱ्या खेळाडूने क्रिकेटमध्ये ऑल राऊंड कामगिरी करण्याची आवश्यकता आहे. हार्दिकला देखील याची जाणीव असून त्यालाही लवकरात लवकर बॉलिंग सुरु करायची आहे’’, असं विराटनं स्पष्ट केलं.
(हे वाचा-IND A vs AUS A : पृथ्वी शॉने पकडला भन्नाट कॅच, पाहा VIDEO)
भारतीय टीमनं वन-डे मालिका गमावल्यानंतर जोरदार कमबॅक करत टी 20 मालिका 2-1 ने जिंकली होती. भारताच्या या विजयात हार्दिकच्या बॅटिंगचे मोलाचे योगदान होतं. हार्दिकने दुसऱ्या टी 20 मधील शेवटच्या ओव्हरमध्ये दोन सिक्सर खेचत भारताला विजय मिळवून दिला. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यात हार्दिकने केवळ 4 ओव्हर बॉलिंग केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी झालेल्या आयपीएल स्पर्धेत हार्दिकने बॉलिंग केली नव्हती.
हार्दिक भारतामध्ये परतणार
वन-डे आणि टी20 मालिका संपल्याने हार्दिक पांड्या मंगळवारी भारतामध्ये परतणार आहे. त्यापूर्वी टीम मॅनेजमेंटने सांगितले तर टेस्ट मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात थांबण्याची तयारी हार्दिकने दाखवली होती. त्यामुळे ‘हार्दिकचा टेस्ट टीममध्ये समावेश होणार’ अशी चर्चा सुरु झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.