ब्रिस्बेन, 14 जानेवारी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चौथ्या टेस्टसाठी टीम इंडियानं एक दिवस आधी टीमची घोषणा करणं टाळलं आहे. यापूर्वीच्या तिन्ही टेस्टपूर्वी टीम इंडियानं एक दिवस आधीच अंतिम अकरा खेळाडूंची घोषणा केली होती. ब्रिस्बेनमध्ये तो पायंडा पाळण्यात आलेला नाही. टीम इंडियाचे बॅटींग कोच विक्रम राठोडनं (Vikram Rathour) याचं कारण सांगितलं आहे.
बुमराहच्या फिटनेसवर लक्ष!
भारतीय टीमचं जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) फिटनेसवर लक्ष आहे. बुमराह फिट असेल तर तो ब्रिस्बेन टेस्टमध्ये खेळेल, असं राठोड यांनी स्पष्ट केलं आहे. सिडनी टेस्टच्या दरम्यान बुमराहच्या पोटातल्या मांसपेशींना दुखापत झाली आहे. इंग्लंड विरुद्धची आगामी मालिका लक्षात घेता टीम मॅनेजमेंट बुमराहच्या फिटनेसबद्दल कोणतीही जोखीम घेण्यास तयार नाही. मात्र, राठोड यांचं ताजं वक्तव्य पाहता बुमराहला ब्रिस्बेन टेस्ट खेळवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न आहे, असं स्पष्ट झालं आहे.
टीम इंडियाचे प्रमुख खेळाडू जखमी
ब्रिस्बेन टेस्टपूर्वी टीम इंडियाचे प्रमुख खेळाडू जखमी आहेत. ऑफ स्पिनर आर. अश्विनची (R. Ashwin) कंबर दुखावली आहे. त्यामुळे त्याचं चौथ्या टेस्टमध्ये खेळणं निश्चित नाही. हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) दुखापतीमुळे या टेस्टमधून आऊट झाले आहेत. मयंक अग्रवाल देखील सरावाच्या दरम्यान जखमी झाला असून त्याचंही ब्रिस्बेन टेस्टमध्ये खेळणं अनिश्चित आहे.
या अडचणीच्या परिस्थितीतही टीम इंडियाला बुमराह फिट होईल ही आशा आहे. टीमचे फिजिओ तो फिट व्हावा म्हणून जोरदार प्रयत्न करत आहेत.
बुमराह का जखमी झाला?
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील पहिल्या तीन टेस्टमध्ये बुमराहनं सर्वात जास्त बॉलिंग केली आहे. त्यानं पहिल्या तीन टेस्टमध्ये 117.4 ओव्हर्स बॉलिंग केली आहे. भारताच्याच नाही तर ऑस्ट्रेलियाच्याही कोणत्या फास्ट बॉलरनं या मालिकेत इतकी बॉलिंग केलेली नाही. त्यानं या मालिकेत 11 विकेट्स घेतल्या आहेत.
भारतानं ब्रिस्बेनमध्ये आजवर एकही टेस्ट जिंकलेली नाही. सध्या ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. ब्रिस्बेनमधील शेवटच्या टेस्टमध्ये या मालिकेचा विजेता निश्चित होऊ शकतो. त्यामुळे ब्रिस्बेन टेस्टसाठी बुमराह फिट व्हावा अशी प्रार्थना टीम इंडियाचे फॅन्स करत आहेत.