कॅनबेरा, 5 डिसेंबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND v AUS) यांच्यातील पहिली टी 20 (T20I) मॅच भारताने जिंकली. या विजयाबरोबरच टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध 1 – 0 अशी आघाडी घेतली आहे. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाला सर्वात जास्त वेळा टी 20 मध्ये हरवण्याच्या पाकिस्तानच्या (Pakistan) विक्रमाची टीम इंडियाने बरोबरी केली आहे.
कॅनबेरामध्ये झालेल्या पहिल्या T20 मॅचमध्ये टीम इंडियाने पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारीत 20 ओव्हर्समध्ये 7 आऊट 161 रन्स केले होते. के.एल. राहुलने सर्वात जास्त 51 रन्स काढले तर रवींद्र जडेजाने 23 बॉल्समध्ये नाबाद 44 रन्सची आक्रमक खेळी केली. ऑस्ट्रेलियन टीमला हे आव्हान पेलवले नाही. त्यांना निर्धारीत ओव्हर्समध्ये 7 आऊट 150 रन्सच करता आले. टीम इंडियाने 11 रन्सने मॅच जिंकताच पाकिस्तानच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
टीम इंडियाला संधी
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात जास्त T20 जिंकण्याच्या बाबतीमध्ये भारत आणि पाकिस्तान आता संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत. ही सीरिज सुरु होण्यापूर्वी टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर होती. पहिली मॅच जिंकून टीम इंडियाने पाकिस्तानची बरोबरी केली आहे. आता या सीरिजमधील आणखी दोन मॅच बाकी आहेत. त्यामुळे त्या जिंकून टीम इंडियाला पाकिस्तानला मागे टाकण्याची संधी आहे.
टीम इंडियाचे वर्चस्व
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या T20 मॅचमध्ये टीम इंडियाचे वर्चस्व आहे. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत 21 T20 झाल्या असून यापैकी टीम इंडियाने 12 तर ऑस्ट्रेलियाने 8 T20 जिंकल्या आहेत. एक T20 मॅच पावसामुळे रद्द झाली होती.
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील दुसरी T20 रविवारी सिडनीमध्ये होणार असून तिसरी आणि अंतिम T20 लढत मंगळवारी सिडनीतच होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियातील पहिला टेस्ट सामना 17 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये दिवस-रात्र खेळवला जाणार आहे.