मुंबई, 14 डिसेंबर: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पहिली टेस्ट सुरू होण्यापूर्वीच पुढच्या तीन टेस्टची चर्चा सुरू झाली आहे. पहिल्या टेस्टनंतर भारतीय टीमचा (Team India) कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) त्याला मुल होणार असल्यानं पितृत्वासाठी रजा (Paternity Leave) घेऊन भारतामध्ये परतणार आहे. बीसीसीआयनं (BCCI) विराटला तशी परवानगी देखील दिली आहे.
विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये उर्वरीत मालिकेत अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) भारताचं नेतृत्व करेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रतिष्ठेच्या मालिकेत टीमचं नेतृत्व करण्याचा दबाव हंगामी कॅप्टन रहाणेवर असेल असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे. भारताचे महान क्रिकेटपटू आणि माजी कॅप्टन सुनील गावसकर यांनाही तो प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गावसकरांनी एक महत्वाचं विधान केलं आहे.
काय म्हणाले गावसकर?
“अजिंक्य रहाणेवर कॅप्टनसीचं कोणतंही ओझं नसेल. त्यानं यापूर्वी दोन टेस्टमध्ये भारताचं नेतृत्वं केलं आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध धर्मशालामध्ये आणि अफगाणिस्तान विरुद्ध बंगळुरुत टेस्ट जिंकली होती. त्यामुळे कॅप्टनसीचा विचार केला तर रहाणेवर कोणतेही दडपण नसेल. आपण हंगामी कॅप्टन आहोत याची जाणीव त्याला आहे. त्यामुळे तो त्याचा फारसा विचार करणार नाही. एक खेळाडू म्हणून आणि बॅट्समन म्हणून चांगली कामगिरी करणं इतकंच रहाणेच्या हातात आहे’’, असं गावसकर म्हणाले. ‘स्टार स्पोर्ट्स’ वरील ‘गेम प्लॅन’ या कार्यक्रमात गावसकर बोलत होते.
अजिंक्यची दमदार सुरुवात
मुंबईकर अजिंक्य रहाणेसाठी आयपीएल स्पर्धा फारशी चांगली गेली नव्हती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यानं चांगली सुरुवात केली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये पहिल्या टेस्टपूर्वी झालेल्या दोन्ही प्रॅक्टीस मॅचमध्ये त्यानं टीमचं नेतृत्व केलं. त्यापैकी पहिल्या प्रॅक्टीस मॅचमध्ये त्यानं ‘कॅप्टन नॉक’ खेळत शतक झळकावले होते. विराटच्या अनुपस्थितीमध्ये रहाणे उर्वरित टेस्ट मालिकेत चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला येण्याची शक्यता आहे.
विराटच्या जागेवर कोण?
विराट कोहलीच्या जागेवर उर्वरित तीन टेस्टसाठी लोकेश राहुलचं नाव आघाडीवर आहे. राहुलसाठी हे वर्ष चांगलं गेलं आहे. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत राहुलनं चांगले रन्स काढले होते. तर आयपीएल स्पर्धेत सर्वात जास्त रन्स काढत ऑरेंज कॅप पटकावली होती.
टीम मॅनेजमेंटसमोर राहुल प्रमाणेच ऋषभ पंतचा देखील पर्याय आहे. आयपीएल स्पर्धेत फारशी कमाल न करणाऱ्या पंतनं दुसऱ्या प्रॅक्टीस मॅचमध्ये शतक केले होते. पंतनं फक्त 73 बॉल्समध्ये नाबाद 103 रन्स काढत भारतीय टीमकडून टेस्ट खेळण्यासाठी सज्ज असल्याचं दाखवलं आहे.