मुंबई, 1 जानेवारी: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात मेलबर्नमध्ये झालेली बॉक्सिंग डे (Boxing Day) टेस्ट भारतानं आठ विकेट्सनं जिंकली. पहिल्या टेस्टमधील धक्कादायक शरणागतीनंतर टीम इंडियानं मेलबर्नमध्ये कमबॅक केलं. पाकिस्तानचा फास्ट बॉलर शोएब अख्तरनं (Shoaib Akhtar) या विजयाबद्दल अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) टीमची जोरदार प्रशंसा केली आहे.
काय म्हणाला अख्तर?
‘स्पोर्ट्स टुडे’ शी चर्चा करताना अख्तर म्हणाला, “टीम इंडियानं ज्या वृत्तीचं दर्शन घडवलं ती जबरदस्त आहे. माझ्या मते हे खेळाडू अगदी शांत आहेत. अजिंक्य रहाणे मैदानावर ओरडत नाही. कोणती वाईट गोष्ट करत नाही. तो शांतपणे त्याचं काम करतो. त्याला ‘कुल कॅप्टन’ म्हणता येईल. त्याच्या कॅप्टनसीमध्ये टीमनं अचानक चांगला खेळ केला. भारतीय टीमची स्ट्रेंथ ही मॅचमधील खेळाडू नसून बेंच स्ट्रेंथ आहे. त्यांनी संधीचं सोनं केलं आणि चांगला खेळ केला.’’
(हे वाचा: युवराज सिंहला BCCI नं परवानगी नाकारल्याबद्दल त्याचे वडील योगराज म्हणाले....)
भारताच्या विजयावर अख्तर चांगलाच भारावला आहे. “आजपासून 10-15 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाला भारत, पाकिस्तान किंवा एखादी आशियाई टीम हरवेल याची कुणी कल्पनाही केली नव्हती. माझी इच्छा आहे, टीम इंडियानं टेस्ट सीरिज जिंकावी. कारण, त्यांनी जबरदस्त कमबॅक केलं आहे. अजिंक्य रहाणेचं शतक हा टर्निंग पॉईंट होता, ’’ असं अख्तरनं सांगितलं.
तिसऱ्या टेस्टमध्ये कोण खेळणार?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी टेस्ट ही सात जानेवारीपासून सिडनीमध्ये होणार आहे. या टेस्टमध्ये रोहित शर्माचं टीममधील पुनरागमन नक्की मानलं जात आहे. सिडनी टेस्टसाठी रोहित शर्माने सरावाला सुरूवात केली आहे. बीसीसीआयने रोहित शर्माचे फोटो शेयर केले आहेत.
(हे वाचा: बेन स्टोक्सच्या पोस्टनंतर ICC नं मागितली माफी, वाचा काय आहे प्रकरण)
पहिल्या दोन टेस्टमध्ये मयंक अगरवाल आणि हनुमा विहारी अपयशी ठरले, त्यामुळे या दोघांपैकी एकाला बाहेर ठेवून रोहित शर्माला संधी मिळू शकते. तर फास्ट बॉलर उमेश यादव दुखापतीमुळे उर्वरित सीरिजमधून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी नवदीप सैनी किंवा शार्दूल ठाकूर यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.