मुंबई, 28 डिसेंबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) कसोटी मालिका पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) साठी खराब गेली आहे. या टेस्टपूर्वी झालेल्या सराव सामन्यात तो अपयशी ठरला. त्यानंतर पहिल्या टेस्टमधील दोन्ही डावात मिळून त्याला फक्त 4 रन करता आले होते. सततच्या अपयशामुळे मेलबर्न टेस्टमध्ये पृथ्वीला वगळण्यात आलं.
पृथ्वी सोबत अंडर 19 वर्ल्ड कप एकत्र खेळलेला शुभमन गिलनं (Shubman Gill) त्याची जागा घेतली. गिलनं मेलबर्न टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 45 रन काढले. त्यामुळे पृथ्वी शॉ ची उर्वरित कसोटी मालिकेत खेळण्याची शक्यता कमी आहे. क्रिकेट करियरमध्ये अडचणीत सापडलेल्या पृथ्वीच्या मदतीला जगातील सर्वात महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) धावून आला आहे.
काय आहे सचिनचा सल्ला?
सचिन जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी त्याचं लक्ष क्रिकेटकडेच असतं. कोणत्याही खेळाडूच्या खेळातील उणीवा त्याच्या नजरेतून सुटत नाहीत. सचिननं पहिल्या टेस्टमधला पृथ्वीचा खेळ पाहून त्याला सल्ला दिला आहे.
“पृथ्वी शॉ ला बॅकलिफ्टची अडचण आहे. त्याचे हात शरिरापासून दूर असतात. त्यामुळे बॉलचा सामना करताना त्याला त्रास होतो. बॉल अचानक आतमध्ये आला तर पृथ्वी शॉ सह कोणताही बॅट्समन त्याला नीट खेळू शकत नाही. बॅट्समनचा फॉर्म हरपला असेल, त्याची लय बिघडली असेल तर अनेकदा बॉल त्याच्या बॅटच्या कडांना स्पर्श करुन फिल्डरच्या हातामध्ये जातो. त्यामुळे पृथ्वीनं बॅकलिफ्टवर काम केलं पाहिजे,’’ असा मोलाचा सल्ला सचिननं दिला आहे.
“बॅकलिफ्टसह पृथ्वीचं फुटवर्कही नीट होत नाही, असं निरीक्षण सचिननं नोंदवलं आहे. अॅडलेड कसोटीच्या दुसऱ्या डावात पृथ्वीचा बॉल खेळताना पुढचा पाय हवेत होता. त्यामुळे त्याचं संतुलन बिघडलं आणि तो बोल्ड झाला. खेळताना तुमची जी मनस्थिती असते त्याचा परिणाम फुटवर्कवर होतो. तुम्हाला नीट खेळता येत नसेल तर तुमचा मेंदू पायांना योग्य प्रकारे हलचाल करण्याची सूचना करत नाही. तुमच्या डोक्यात खूप काही गोष्टी एकाच वेळी सुरु असतात. त्याचा परिणाम फुटवर्कवर होतो.’’ असं मत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रन्स करणाऱ्या सचिन तेंडुलकरनं व्यक्त केलं आहे.
सचिन तेंडुलकरनं दिलेल्या सल्ल्याची अंमलबजावणी केली तर पृथ्वी शॉ लवकरच भारतीय टीममध्ये पुनरागमन करेल. त्याचबरोबर भरपूर रनही करेल यात कोणतीही शंका नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket