नवी दिल्ली, 13 मार्च: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम वनडे सामन्यात भारताच्या रोहित शर्माने नव्या विक्रमाला गवसणी घातली. फिरोजशाह कोटला मैदानावर रोहितने 46वी धाव घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 8 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा तो केवळ नववा भारतीय तर 30वा खेळाडू ठरला आहे.
रोहितने 200व्या वनडे सामन्यात 8 हजार धावांचा टप्पा पार केला. वनडेत वेगवान 8 हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आता तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने देखील 200व्या डावात 8 हजार धावांचा टप्पा पार केला होता. या यादीत भारताचा कर्णधार विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे. त्याने 175व्या डावात 8 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या एबी डीव्हिलियर्स याचा क्रमांक लागतो. त्याने 182 डावात हा टप्पा पार केला होता.
भारताकडून रोहित शर्माच्या आधी विराट कोहली, गांगुली, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग आणि मोहम्मद अझरुद्दीन यांनी अशी कामगिरी केली आहे.
या सामन्यात जर रोहितने शतक केले असते तर त्याने सौरव गांगुलीचा 22 शतकांचा विक्रम मागे टाकला. वनडेत रोहित आणि गांगुलीने प्रत्येकी 22 शतके केली आहेत. पण गांगुलीचा हा विक्रम मागे टाकण्यासाठी रोहितला आणखी वाट पाहावी लागणार आहे.
तसेच आज त्याने 76 धावा केल्या असत्या तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ हजार धावा करणारा तो जगातील चौथा फलंदाज ठरला असता. याआधी अशी कामगिरी सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा आणि व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी केली आहे. रोहितने आज 56 धावा केल्या त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2 हजार धावा करण्यासाठी त्याला अद्याप 20 धावांची गरज आहे.
VIDEO : काँग्रेसच्या नेत्याचं भाकित, 'खोतकर 2 लाख मतांनी जिंकतील'