मेलबर्न, 27 डिसेंबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे टेस्ट सुरु आहे. या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये भारताने (Team India) चांगली कामगिरी केली आहे. कॅप्टन अजिंक्य रहाणेचा (Ajinkya Rahane) संयमी खेळ आणि पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या शुभमन गिलचे (Shubman Gil) 45 रन्स हे भारतीय टीमच्या कामगिरीचं वैशिष्ट्य होतं. भारताच्या पहिल्या इनिंगमध्ये ऋषभ पंतने (Rishabh Pant) 52 वर्ष जुन्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.
पंतचा नवा रेकॉर्ड
ऋषभ पंत अॅडलेडमध्ये झालेली पहिली टेस्ट खेळला नव्हता. अॅडलेडमधील लज्जास्पद पराभवानंतर मॅलबर्न टेस्टमध्ये त्याचा समावेश करण्यात आला. पंत बॅटिंगला आला तेंव्हा भारताची अवस्था 4 आऊट 116 अशी होती. संपूर्ण इनिंग 36 रन्सवर संपुष्टात येण्याचा अनुभव ताजा असल्यानं टीमला पार्टरनरशिपची गरज होती. पंतनं रहाणेसोबत पाचव्या विकेटसाठी 57 रन्सची उपयुक्त पार्टरनशिप केली. मिचेल स्टार्कानं (Mitchell Starc) पंतला 29 रन्सवर आऊट करत ही जोडी फोडली.
पंतनं 25 रन्सचा टप्पा पार केल्यानंतर एक विक्रमाची बरोबरी केली. ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट खेळताना सलग आठ इनिंगमध्ये 25 पेक्षा जास्त रन काढणारा तो चौथा विदेशी खेळाडू बनला आहे. यापूर्वी वॉली हॅमंड, रुसी मुर्ती आणि सर व्हिव रिचर्ड या तिघांनी कामगिरी केली होती. रुसी मुर्तींनंतर ही कामगिरी करणारा पंत हा दुसरा भारतीय आहे. मुर्ती यांनी 1967-1968 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात हा विक्रम केला होता. त्यानंतर तब्बल 52 वर्षांनी पंतनं या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.
भारताला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) राखण्याच्या आशा पल्लवीत ठेवण्यासाठी मेलबर्न टेस्ट जिंकणे आवश्यक आहे. या सीरिजमधील पहिली टेस्ट जिंकून ऑस्ट्रेलिया 1-0 ने आघाडीवर आहे. भारतानं पहिल्या पराभवानंतर दुसऱ्या टेस्टमधील टीममध्ये चार बदल केले आहेत.