सिडनी, 11 जानेवारी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चौथी टेस्ट ब्रिस्बेनमध्ये होणार आहे. टीम इंडिया (Team India) ब्रिस्बेनमध्ये जाणार आहे की नाही? याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. या टेस्टमुळे भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) ही टेस्ट सीरिज अडचणीत येऊ शकते, अशाही बातम्या आहेत. टीम इंडियाचा या विषयावर अधिकृत निर्णय अजून जाहीर झालेला नाही. त्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन रिकी पाँटींगनं (Ricky Ponting) भारतीय टीमवर कडवट टीका केली आहे.
काय म्हणाला पाँटींग?
रिकी पाँटींग सध्या चॅनल 7 वर कॉमेंट्री करत आहे. त्यावेळी त्यानं टीम इंडियावर सडकून टीका केली. “ब्रिस्बेनमध्ये न जाण्यासाठी टीम इंडिया कारणं शोधत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला भारतीय टीमला ब्रिस्बेनमधील क्वारंटाईन विषयीच्या नियमांची चिंता होती. आता त्यांना कोरोनाची भीती सतावत आहे. बायो बबलच्या गोष्टी माझ्यासाठी अजब आहेत. कारण ऑस्ट्रेलियाचे खेळाडू भारतीय खेळाडूंपेक्षा जास्त काळ बायो बबलमध्ये राहिले आहेत. ऑस्ट्रेलियन खेळाडूही भारताप्रमाणे हॉटेलमध्ये बंद असतील. आम्ही आयपीएल स्पर्धेच्या वेळी कोणत्याही भारतीय खेळाडूकडून याबबतच्या तक्रारी ऐकल्या नाहीत.’’ अशी टीका पाँटिंगनं केली आहे.
‘हे पूर्वीपासून माहिती होतं.’
रिकी पाँटींग इतकी टीका करुन थांबला नाही. त्यानं टीम इंडियाला नियमांची आठवण करुन दिली. “भारतीय खेळाडू हे त्यांच्या घरापासून दूर आहेत, हे खरं आहे. त्यांना ही गोष्ट पहिल्यापासूनच माहिती होती. या गोष्टी कुणासाठीही चांगल्या नाहीत. पण, ते ब्रिस्बेनला गेले तर त्यांना हॉटेलमध्ये बंद राहावंच लागेल.’’
हे वाचा-IND vs AUS: वर्णद्वेषी टिप्पणीवरून विराट संतापला
टीम इंडियाचा आक्षेप काय?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी टेस्ट 15 जानेवारी रोजी होणार आहे. या टेस्टसाठी टीम इंडिया मंगळवारी ब्रिस्बेनला रवाना होईल. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भारतीय टीम दुबईमध्ये 14 दिवस क्वारंटाईन होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतरही टीम क्वारंटाईन होती. आता दौऱ्याच्या शेवटी ब्रिस्बेनमध्ये पुन्हा एकदा क्वारंटाईन राहण्याची टीमची तयारी नाही.
सध्या ब्रिटनहून दिल्लीत येणाऱ्या प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह आल्यानंतर 7 दिवस क्वारंटाईन आणि त्यानंतरचा एक आठवडा घरात क्वारंटाईन व्हावं लागत आहे. हा नियम टीम इंडियासाठीही लागू झाला, तर 5 फेब्रुवारीपासून सुरु होणारी भारत-इंग्लंड सीरिज प्रभावित होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs Australia