ब्रिस्बेन, 14 जानेवारी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात सिडनीमध्ये झालेली टेस्ट भारतीय फॅन्स सहजासहजी विसरणार नाहीत. त्या टेस्टमध्ये भारताचा पराभव जवळपास निश्चित मानला जात होता. त्यावेळी टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंनी संयमी आणि निग्रही खेळी करत टेस्ट ड्रॉ केली. भारताच्या खेळामुळे ऑस्ट्रेलियातील अनेक वाचाळ क्रिकेपटूंची बोलती बंद झाली होती.
सिडनी टेस्ट ड्रॉ करण्यात भारताचा ऑफ स्पिनर आर. अश्विनचं (R. Ashwin) मोलाचं योगदान होतं. अश्विनं ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्याचा शांतपणे सामना केला. त्यानं 128 बॉलमध्ये नाबाद 39 रन केले. तो हनुमा विहारी (Hanuma Vihari) सोबत 259 बॉल मैदानात उभा होता.
अश्विनची अविस्मरणीय खेळी
अश्विननं टेस्ट क्रिकेटमध्ये चार शतक झळकावली आहेत. या शतकांपेक्षाही अश्विनची सिडनीमधील खेळी खास होती. त्याला चौथ्या दिवशी खाली वाकता देखील येत नव्हतं. तरीही तो पाचव्या दिवशी मैदानात घट्ट पाय रोवून उभा होता. सिडनी टेस्टच्या दरम्यान अश्विनला किती त्रास होत होता आणि मॅच संपल्यानंतर तो किती हळवा झाला होता याचा खुलासा त्याची बायको प्रिती अश्विननं (Prithi Ashwin) केला आहे.
पाचव्या दिवशी सकाळी काय झालं?
प्रिती अश्विननं ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये लेख लिहिला आहे. या लेखात तिनं सिडनी टेस्टच्या पाचव्या दिवशी काय घडलं हे सविस्तर मांडलं आहे. “पाचव्या दिवशी सकाळी अश्विन पाठदुखीमुळे त्रस्त झाला होता. त्याला खाली वाकता येत नव्हतं. तसंच बसल्यानंतर सरळ उभं राहता येत नव्हतं. मी अश्विनला अशा प्रकारे कधीही पाहिलेलं नव्हतं. तू बॅटिंग कशी करणार? हा प्रश्न मी त्याला विचारला. त्यावेळी मला मैदानात जाऊ दे मी काही तरी मार्ग काढेन, असं उत्तर अश्विननं दिलं.
त्यानंतर अश्विन रुमच्या बाहेर पडला. अश्विन बाहेर पडल्यानंतर काही तासांमध्ये मला त्याला हॉस्पिटलमध्ये स्कॅनसाठी नेलं आहे, असा फोन येईल असं वाटलं होतं,’’ असं प्रितीनं म्हंटलं आहे.
अश्विन बॅटिंगला आल्यावर काय वाटलं?
चेतेश्वर पुजारा आऊट झाल्यानंतर अश्विन बॅटिंगसाठी उतरला. त्याला टीव्हीवर पाहिल्यानंतर प्रिती म्हणते, “ मी नवऱ्याकडून काय अपेक्षा करु हे मला समजत नव्हतं. मात्र मी त्याचा चेहरा पाहिला तेंव्हा तो त्याच्या झोनमध्ये गेला असल्याचं मला जाणवलं. मी यापूर्वीही अश्विनच्या चेहऱ्यावर तो आत्मविश्वास पाहिला आहे.
मैदानात त्याच्या हातावर, खांद्यावर बॉल लागला. फिजिओनं त्याच्यावर उपचार केले. ऑस्ट्रेलियात हेच होणार, तो या प्रकारचे बॉल खेळू शकतो हे मला माहिती होते. मात्र त्याला कंबर दुखीचा त्रास होत होता. त्यामुळे तो सर्व प्रकारची बॉलिंग खेळू शकणार नाही, याची चिंता मला सतावत होती,’’ असा अनुभव प्रितीनं मांडला आहे.
‘’शेवटच्या पाच ओव्हर्स बाकी होत्या. त्यावेळी ऑस्ट्रेलिया मॅच ड्रॉ का करत नाही? हा प्रश्न मला पडला होता. मी प्रत्येक बॉल मोजत होते. मी आनंदानं उड्या मारत होते. ते पाहून आपण मॅच जिंकलो का? हा प्रश्न मुलींनी मला विचारला. मी त्यांना काही उत्तर दिलं नाही. मी फक्त आनंदी होते,’’ असं प्रितीनं सांगितलं
…आणि अश्विन रडला!
‘’अश्विन मॅच संपल्यानंतर रुममध्ये आला त्यावेळी तो खूप हसला त्याचबरोबर रडला. अश्विनच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहात होत्या. त्याचबरोबर त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. तो एकच वेगळाच अनुभव होता. अश्विन फक्त दोन मिनिटे त्याच्या खोलीत होता. त्यानंतर तो फिजिओकडं गेला.’’ असं प्रितीनं सांगितलं आहे.