ब्रिस्बेन, 18 जानेवारी : ब्रिस्बेन टेस्टमध्ये टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद सिराजनं (Mohammed Siraj) इतिहास रचला आहे. ब्रिस्बेन टेस्टच्या चौथ्या दिवशी सिराजनं 73 रन देऊन पाच विकेट्स घेतल्या. टेस्ट करियरमध्ये एका इनिंगमध्ये पाच विकेट घेण्याचा पराक्रम सिराजनं पहिल्यांदाच केला आहे. त्याचबरोबर त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 551 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणाऱ्या दिग्गज बॉलरचा रेकॉर्ड मोडला आहे.
सिराजनं या मालिकेत एकूण 13 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर सिराज ऑस्ट्रेलियामध्ये पदार्पणाच्या टेस्ट सीरिजमध्ये सर्वात जास्त विकेट घेणारा बॉलर बनला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड जवागल श्रीनाथच्या (Javagal Srinath) नावावर होता. श्रीनाथनं 1991-92 च्या सीरिजमध्ये 10 विकेट्स घेतल्या होत्या.
ब्रिस्बेनच्या गॅबा पिचवर चांगली कामगिरी करणारा सिराज हा दुसरा भारतीय बॉलर आहे. यापूर्वी मदनलाल यांनी 1977 मध्ये या पिचवर 72 रन देऊन 5 विकेट्स घेतल्या होत्या. मदनलाल यांचा विक्रम मोडण्याची सिराजची संधी फक्त 2 रननं हुकली.
बुमराहची जादूची झप्पी
सिराजनं हेजलवुडला आऊट करताच पाच विकेट्स पूर्ण केल्या. त्यावेळी भारतीय टीममधल्या सर्वांनी त्याचं अभिनंदन केलं. सिराजनं मैदानाच्या बाहेर पडताना टीमचं नेतृत्त्व केलं. त्यानं बाऊंड्री लाईन पार करताच बाहेर उभ्या असलेल्या जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) सिराजची गळाभेट घेतली.
बुमराह आणि सिराज यांच्या गळाभेटीचं महत्त्व आहे. कारण या दोन्ही खेळाडूंना सिडनी टेस्टमध्ये वर्णद्वेषी टिप्पणींचा सामना करावा लागला होता. बुमराह दुखापतीमुळे ब्रिस्बेन टेस्ट खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीमध्ये सिराजनं भारतीय बॉलिंग अटॅकचं नेतृत्त्व केलं. त्याचवेळी पाच विकेट्स घेत स्वत:ला सिद्धही केलं.
A standing ovation as Mohammed Siraj picks up his maiden 5-wicket haul.#AUSvIND #TeamIndia pic.twitter.com/e0IaVJ3uA8
— BCCI (@BCCI) January 18, 2021
मोहम्मद सिराजसाठी हा दौरा सोपा नव्हता. या दौऱ्यापूर्वी त्याच्या वडिलांचं निधन झालं. या मोठ्या आघातानंतरही सिराजनं टीम सोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सिराजला मेलबर्न टेस्टमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. सिडनी टेस्टमध्ये त्याला ऑस्ट्रेलियाच्या हुल्लडबाज प्रेक्षकांनी त्रास दिला. या सर्व विपरित परिस्थितीमध्येही त्यानं खेळावरचं लक्ष विचलित होऊ दिलं नाही. ब्रिस्बेन टेस्टमध्ये चांगली कामगिरी करत त्यानं स्वत:चं नाव आणखी उंच केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs Australia