सिडनी, 13 डिसेंबर: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पहिली टेस्ट 17 तारखेला अॅडलेडमध्ये सुरु आहे. या टेस्टपूर्वी दुखापतीनं बेजार झालेल्या ऑस्ट्रेलियन टीमसाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑस्ट्रेलियाचा मेन फास्ट बॉलर मिचेल स्टार्क (Mitchell Starc) टीममध्ये परत आला आहे. स्टार्कने कौटुंबीक कारणांमुळे टी 20 मालिकेतून माघार घेतली होती.
भारताला स्टार्कचा धोका!
भारताविरुद्धच्या वन-डे मालिकेत स्टार्क फारसा प्रभाव टाकू शकला नव्हता. मात्र पिंक बॉल टेस्टमध्ये (Pink Ball Test) स्टार्कचा जबरदस्त रेकॉर्ड आहे. त्याने या प्रकारात आजवर 42 विकेट्स घेतल्या आहेत. तो आता सोमवारी ऑस्ट्रेलियन टीममध्ये दाखल होणार असून दोन दिवसांच्या सरावानंतर गुरुवारी पहिली टेस्ट खेळण्यासाठी उतरेल.
“मिचेलच्या सध्याच्या परिस्थितीची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. तो या खडतर काळात कुटुंबीयांसोबत होता याचा आनंद आहे”, अशी भावना ऑस्ट्रेलियाचे कोच जस्टीन लँगर यांनी व्यक्त केली आहे. ‘‘त्याचं सोमवारी स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत’’ असंही त्यांनी सांगितले.
मिचेल स्टार्कचा सहकारी जॉस हेझलवूडने देखील स्टार्क टीममध्ये कमबॅक करत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. “पिंक बॉल टेस्टमध्ये स्टार्कचा रेकॉर्ड जबरदस्त आहे हे सर्वांना माहिती आहे. तो आमच्या टीमचा आणि बॉलिंगचा महत्वाचा सदस्य आहे," असे हेजलवूडने सांगितले.
मिचेल स्टार्क टीमममध्ये परतल्याने ऑस्ट्रेलिय टीमची फास्ट बॉलिंग मजबूत झाली आहे. आता स्टार्क, हेजलवूड आणि पॅट कमिन्स हे तीन फास्ट बॉलर पहिल्या टेस्टमध्ये खेळण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियातील पिचवर या अनुभवी आणि धोकादायक त्रिकुटासमोर भारतीय टीमची चांगलीच परीक्षा होणार आहे.
भारताकडून कोण खेळणार?
भारताने ऑस्ट्रेलियात 2018-19 मध्ये बॉर्डर गावस्कर -ट्रॉफी जिंकली होती. त्या विजयात जसप्रीत बुमराह-मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा या फास्ट बॉलर्सचा मोठा वाटा होता. यापैकी इशांत शर्मा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर आलेला नाही. त्यामुळे तिसऱ्या फास्ट बॉलर्सच्या जागेसाठी उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी यांच्यात चुरस आहे. यापैकी उमेश यादव अंतिम अकरामध्ये खेळणार अशी माहिती भारतीय टीमचे कोच रवी शास्त्री यांनी ड्रींक पार्टीत लीक केल्याचा दावा, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयन चॅपल यांनी केला आहे.