सिडनी, 15 डिसेंबर: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 17 डिसेंबरपासून पहिली टेस्ट सुरू होत आहे. चार टेस्ट मालिकांमधील पहिली टेस्ट जिंकून मालिकेची भक्कम सुरुवात करण्याचा दोन्ही टीम्सचा प्रयत्न असेल. पहिली टेस्ट ही डे-नाईट होणार आहे. (Pink Ball Test) त्यामुळे या टेस्टमधील वातावरणात भारतीय टीमचं (Team India) एक खास अस्र ऑस्ट्रेलियावर भारी पडण्याची शक्यता आहे.
भारताचा चायनामन बॉलर कुलदीप यादवनं (Kuldeep Yadav) पहिल्या टेस्टपूर्वी कसून सराव केला आहे. “संध्याकाळच्या सत्रामध्ये स्पिन बॉलिंग खेळणे अवघड होऊ शकते, कारण स्पिन बॉलर्सकडे चांगलंच वैविध्य असतं. ही आमच्यासाठी फायद्याची गोष्ट आहे’’, असं कुलदीपनं सांगितले.
परदेशातील पहिली पिंक बॉल टेस्ट
भारताची परदेशातील ही पहिलीच पिंक बॉल टेस्ट आहे. यापूर्वी भारताने 2019 साली कोलकातामध्ये पिंक बॉल टेस्ट खेळली होती. “भारताबाहेर मला पिंक बॉलनं खेळण्याचा अनुभव नाही. या मॅचमध्ये खेळ कसा होतो हे पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. ऑस्ट्रेलियन पिचवर यापूर्वी देखील स्पिन बॉलर्सनी चांगली कामगिरी केली आहे. नव्या परिस्थितीशी तुम्ही किती लवकर जुळवून घेता, त्यावर तुमचे यश अवलंबून असते ,’’ असंही कुलदीपनं स्पष्ट केलं.
कुलदीप की अश्विन?
अॅडलेडमध्ये होणाऱ्या पहिल्या टेस्टमध्ये भारतीय टीम तीन फास्ट बॉलर्ससह उतरणार हे जवळपास स्पष्ट आहे. त्यामुळे टीममधील चौथ्या बॉलर्ससाठी कुलदीप यादव आणि अनुभवी आर. अश्विन यांच्यात चुरस आहे.
कुलदीप यादवनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच 2017 साली धर्मशाला टेस्टमध्ये पदार्पण केले होते. त्याने आजवर सहा टेस्टमध्ये 24.12 च्या सरासरीनं 24 विकेट्स घेतल्या आहेत. कुलदीपसाठी हे वर्ष निराशाजनक गेलं आहे. आयपीएल स्पर्धेतही त्याची कामगिरी निराशाजनक ठरली होती. या खराब कामगिरीनंतरही निवड समितीनं कुलदीपच्या क्षमतेवर विश्वास ठेवत ऑस्ट्रेलियन मालिकेसाठी त्याची टीममध्ये निवड केली आहे.