मुंबई, 13 जानेवारी: भारतीय क्रिकेट टीमचे (Indian Cricket Team) माजी कॅप्टन दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांनी विराट कोहली (Virat Kohli) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांच्या कॅप्टनसीबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. टीम इंडियानं (Team India) रहाणेच्या कॅप्टनसीमध्ये मेलबर्न टेस्ट जिंकली. तर, सिडनी टेस्ट ड्रॉ केली. या दोन टेस्टच्या निर्णयानंतर वेंगसरकर यांनी हे वक्तव्य केलं आहे. विराट कोहलीच्या कॅप्टनीसाखाली भारतानं अॅडलेडमधील पहिली टेस्ट 8 विकेट्सनं गमावली होती.
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टनसीखाली टीम इंडियानं सिडनीमध्ये जबरदस्त खेळ केला. भारतीय बॅट्समननं चार सत्र आणि 131 ओव्हर्स बॅटिंग करत टीमचा पराभव टाळला. आता या मालिकेतील शेवटची टेस्ट ब्रिस्बेनमध्ये होणार आहे. ऑस्ट्रेलियाला ही टेस्ट जिंकण्यात अपयश आलं तर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) भारताकडंच राहील. दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा, ऑस्ट्रेलियातच पराभव करत भारतानं ही ट्रॉफी जिंकली होती.
रहाणेच्या कॅप्टनसीची प्रशंसा
माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी काळजीवाहू कॅप्टन अजिंक्य रहाणेची जोरदार प्रशंसा केली आहे. त्यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ शी बोलताना सांगितलं की, “रहाणेच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियाचा खेळ उंचावला आहे. पहिल्या टेस्टमध्ये भारताची इनिंग फक्त 36 रनवर संपुष्टात आली होती. त्यानंतर रहाणेनं ज्या पद्धतीनं कॅप्टनसी केली आहे, ती कौतुकास्पद आहे.''
विराटपेक्षा रहाणेसोबत खेळाडू मोकळे
‘’विराट कोहलीच्या तुलनेत अजिंक्य रहाणेशी खेळाडू अधिक मोकळे आहेत. त्यांना पुरेसं स्वातंत्र्य मिळत. वरिष्ठ खेळाडूचं नाही तर शुभमन गिल, नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराज या तरुण खेळाडूंनीही दबावात चांगला खेळ केला आहे,’’ असंही वेंगसरकर यांनी स्पष्ट केलं.
“रहाणेच्या कॅप्टनसीमध्ये खेळाडूंना अधिक स्वातंत्र्य मिळतं त्यामुळे ते अधिक मोकळ्या पद्धतीनं खेळू शकतात. स्वातंत्र्य ही खूप मोठी गोष्ट आहे, जी रहाणेकडून त्यांना मिळते,’’ असा दावा वेंगसरकर यांनी केला आहे.