मुंबई, 24 जानेवारी : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरिजमध्ये पहिली टेस्ट गमावल्यानंतर भारतीय टीमनं (Team India) पुनरागमन केलं. भारतानं या मालिकेतील तीन टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियापेक्षा वरचढ खेळ केला. या टेस्टमध्ये भारतीय टीमचं नेतृत्व अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) केलं होतं. भारतानं ब्रिस्बेनमध्ये झालेल्या चौथ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन 2-1 नं सीरिज जिंकली. या विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंसमोर अजिंक्य रहाणेनं व्यक्त केलेल्या भावनांचा व्हिडीओ (Video) BCCI नं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.
काय म्हणाला अजिंक्य?
अजिंक्य रहाणेनं या विजयाचं श्रेय सांघिक कामगिरीला दिलं आहे. “हा आपल्यासाठी मोठा क्षण आहे. अॅडलेडमध्ये जे घडलं त्यानंतर आपण ज्या पद्धतीनं मेलबर्नमध्ये पुनरागमन केलं तो एक जबरदस्त अनुभव होता. यामध्ये फक्त एक किंवा दोन खेळाडूंनी नाही तर संपूर्ण टीमनं एकजुटीनं प्रयत्न केले. आपण विजय मिळवून ही मॅच समाप्त केली. ही खूप चांगली गोष्ट आहे.’’ अशी भावना अजिंक्यनं बोलून दाखवली.
As we draw curtains on our historic triumph and start our preparations for the home series, here’s Captain @ajinkyarahane88‘s address to #TeamIndia from the Gabba dressing room.
Full 🎥https://t.co/Sh2tkR5c7j pic.twitter.com/l7wr6UXSxq
— BCCI (@BCCI) January 23, 2021
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार टेस्टच्या सीरिजमध्ये भारतानं अॅडलेडमधील पहिली टेस्ट अवघ्या अडीच दिवसांमध्ये गमावली होती. त्यानंतर मेलबर्नमध्ये जबरदस्त कामगिरी करत आठ विकेट्सनं विजय मिळवला. या विजयात अजिंक्य रहाणेचं मोठं योगदान होतं. त्यानंतर सिडनीमध्ये भारतीय बॅट्समन्सनं पाचव्या दिवशी चिवट खेळ करत टेस्ट ड्रॉ केली होती. भारतीय खेळाडूंनी या सर्व कामगिरीवर ब्रिस्बेनमध्ये कळस चढवला. त्यांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मालिका जिंकली. भारतानं ब्रिस्बेनमध्ये पहिल्यांदाच टेस्ट जिंकली असून ऑस्ट्रेलियानं 1988 नंतर पहिल्यांदाच ब्रिस्बेनमध्ये एखादी टेस्ट गमावली आहे.
अजिंक्यची सर्वत्र प्रशंसा
या ऐतिहासिक विजयाबद्दल अजिंक्य रहाणेची सर्वत्र प्रशंसा होत आहे. विराट कोहली मायदेशी परतल्यानंतर अजिंक्यनं अगदी कमी कालावधीमध्ये टीमला लढण्यासाठी तयार केलं. शांत वृत्तीच्या अजिंक्यनं मैदानात आक्रमक कॅप्टनसी केली. टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांनी हा खुलासा केला आहे. त्यानं सर्व तरुण बॉलर्सना प्रोहत्सान दिलं. ब्रिस्बेन टेस्टपूर्वी बुमराह, अश्विन आणि जडेजा हे अनुभवी बॉलर्स जखमी झाले. त्यानंतर शार्दुल ठाकूर, टी. नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर या तरुण खेळाडूंनी त्यांची जागा घेत भारताला मॅच जिंकून दिली.