ब्रिस्बेन, 16 जानेवारी: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात ब्रिस्बेनमध्ये चौथी आणि शेवटची टेस्ट सुरु आहे. या टेस्टमध्ये टीम इंडियावर (Team India) मोठी आघाडी घेण्याचं ऑस्ट्रेलियाचं स्वप्न पूर्ण झालं नाही. वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) या जोडीनं 7 व्या विकेटसाठी 123 रन्सची भागिदारी केली. शार्दुल ठाकूरनं 67 रन काढले. तर, सुंदर 62 रन काढून आऊट झाला. त्यांच्या या भागिदारीमुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात फक्त 33 रनची आघाडी मिळाली आहे.
भारतीय टीमच्या फॅन्ससाठी 33 या आकड्याचं खास महत्त्व आहे. 2003-04 च्या दौऱ्यात अॅडलेड टेस्टमध्येही ऑस्ट्रेलियानं भारतावर पहिल्या डावात फक्त 33 रनची आघाडी घेतली होती. भारतीय टीमनं त्यानंतर दुसऱ्या डावात आणखी कामगिरी उंचावत ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं. त्यामुळे आता पुन्हा 17 वर्षांनी तो योग जुळून आला आहे.
अॅडलेडमध्ये काय झालं होतं?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 12 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2003 य़ा काळात अॅडलेडमध्ये टेस्ट मॅच झाली होती. त्या मालिकेतील ती दुसरी टेस्ट होती. ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा बॅटिंग करताना रिकी पॉन्टिंगच्या (Ricky Ponting) द्विशतकामुळे 556 रनचा डोंगर उभारला होता.
भारताकडून राहुल द्रविडनं (Rahul Dravid) द्विशतक झळकात ऑस्ट्रेलियाला चोख उत्तर दिलं. द्रविडनं 233 रन्सची ऐतिहासिक खेळी केली होती. त्याला व्ही.व्ही.एस. लक्ष्मणनं (VVS Laxman) 148 रन काढत द्रविडला भक्कम साथ दिली होती. या दोघांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात फक्त 33 रनची आघाडी घेता आली होती.
भारतीय टीमनं दुसऱ्या डावात आणखी चांगला खेळ केला. मुंबईकर अजित आगरकरनं (Ajit Aagarkar) 41 रन्स देत सहा विकेट्स घेतल्या. आगरकरच्या भेदक बॉलिंगमुळे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 200 रनही करता आले नाहीत. त्यानंतर 230 रन्सचं आव्हान भारतानं 4 विकेट राखून पूर्ण केलं. 1981 नंतर पहिल्यांदाच भारताला ऑस्ट्रेलियात विजय मिळवता आला होता.
तेंव्हा आगरकर आता शार्दुल!
आता ब्रिस्बेन टेस्टमध्येही ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 33 रनची आघाडी मिळाली आहे. अॅडलेड आणि ब्रिस्बेन टेस्टमध्ये फक्त 33 हा एक समान धागा नाही. त्या टेस्टमध्ये द्रविड-लक्ष्मण जोडीनं ऑस्ट्रेलियाला अगदी अनपेक्षित प्रतिकार केला होता. यंदा सुंदर-शार्दुल जोडीनं तसा प्रतिकार केला. या दोघांनीही उपयुक्त असं अर्धशतक झळकावलं. ऋषभ पंत आऊट झाल्यानंतर भारतावर मोठी आघाडी घेण्याचं ऑस्ट्रेलियाचं स्वप्न पूर्ण झालं नाही.
अॅडलेडमध्ये भारतीय बॉलिंग अटॅकचं नेतृत्त्व मुंबईकर अजित आगरकरनं केलं होतं. या टेस्टमध्ये शार्दुल ठाकूर हा मुंबईचा फास्ट बॉलर भारताकडून खेळतोय. शार्दुलनं पहिल्या डावात 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर बॅटिंग करताना अर्धशतक झळकावलं. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनंही ‘तुला परत मानलं रे ठाकूर’ असं खास ट्विट करत शार्दुलच्या खेळाला दाद दिली आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात शार्दुल अधिक जोमानं खेळेल आणि अॅडलेडमधील अजित आगरकरसारखा पराक्रम करेल अशी फॅन्सना आशा आहे.
विशेष म्हणजे भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) यानं देखील ट्विट करत या अनोख्या योगायोगाकडं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
Adelaide 2003 : India conceded a lead of 33. Today in Brisbane India concede 33 , when at one stage it looked like they may end up conceding 133.
Great effort considering that Australia’s 4 bowlers had more than 1000 Test wickets to India’s 5 bowlers having 11. Shandar Zabardast
— Virender Sehwag (@virendersehwag) January 17, 2021
ऑस्ट्रेलियाला 33 अनलकी!
ऑस्ट्रेलियानं फक्त अॅडलेडमध्ये नाही तर 1979-80 च्या कानपूर टेस्टमध्ये भारतावर 33 रनची आघाडी घेतली. त्या टेस्टमध्ये देखील भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्यामुळे कानपूर, अॅडलेडमध्ये जे घडलं ते ब्रिस्बेनमध्येही होणार का? हे समजण्यासाठी आता जास्तीत जास्त दोन दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.