अॅडलेड, 17 डिसेंबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामधील पहिल्या टेस्टला गुरुवारी अॅडलेडमध्ये सुरुवात होणार आहे. चार टेस्टच्या या मालिकेतील पहिली टेस्ट खेळून भारतीय टीमचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) मायदेशी परतणार आहे. विराटला पितृत्वासाठीची रजा (Paternity Leave) बीसीसीआयनं (BCCI) मंजूर केली आहे.
विराटच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) भारतीय टीमचं नेतृत्व करणार आहे. पहिल्या टेस्टपूर्वी या विषयावर बोलताना विराटनं अजिंक्यच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.
काय म्हणाला विराट?
“रहाणे आणि माझ्यात उत्तम सामंजस्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासून परस्परांबद्दल असलेल्या विश्वासातून हे नातं निर्माण झाले आहे. रहाणेनं दोन सराव सामन्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. तो अगदी ठाम दिसत असून त्याला टीमचं बलस्थान माहिती आहे. तसेच त्यासाठी नेमकं काय करण्याची गरज आहे, याचीही त्याला जाणीव आहे,’’ अशा स्पष्ट शब्दात विराटनं अजिंक्यवर विश्वास व्यक्त केला आहे.
“मी ऑस्ट्रेलियात असेपर्यंत कॅप्टनसी आणि टीमचं नेतृत्व करण्याबरोबरचं माझं टीममधील काम संपूर्ण क्षमतेनं करण्याचा माझा प्रयत्न आहे. मी आणि रहाणे एकाच पातळीवर असून अजिंक्यला आता एक खेळाडू म्हणून पुढं येऊन उत्तम कामगिरी करण्याची संधी आहे,’’ असंही विराटनं यावेळी स्पष्ट केले.
'Ajinkya and I are on the same page and I’m sure he'll do a tremendous job in my absence,' says #TeamIndia Skipper @imVkohli on the eve of the first Test against Australia.#AUSvIND pic.twitter.com/S8fmUABfUC
— BCCI (@BCCI) December 16, 2020
गावसकरांनी दाखवला होता विश्वास
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर भारताचे माजी दिग्गज प्लेअर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी देखील विश्वास व्यक्त केला आहे. सुनील गावसकर यांना रहाणेच्या नेतृत्वात भारतीय टीमकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे. विराटच्या अनुपस्थित रहाणे कोणत्याही दबावाखाली येणार नाही आणि तो पुढे होऊन टीमचे नेतृत्व करेल, असे गावसकर म्हणाले होते.
अजिंक्यची दमदार सुरुवात
मुंबईकर अजिंक्य रहाणेसाठी आयपीएल स्पर्धा फारशी चांगली गेली नव्हती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यानं चांगली सुरुवात केली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये पहिल्या टेस्टपूर्वी झालेल्या दोन्ही प्रॅक्टीस मॅचमध्ये त्यानं टीमचं नेतृत्व केलं. त्यापैकी पहिल्या प्रॅक्टीस मॅचमध्ये त्यानं ‘कॅप्टन्स नॉक’ खेळत शतक झळकावले होते. विराटच्या अनुपस्थितीमध्ये रहाणे उर्वरित टेस्ट मालिकेत चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला येण्याची शक्यता आहे.