सिडनी, 11 जानेवारी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील सिडनी टेस्ट ड्रॉ झाली. टीम इंडियाच्या (Team India) जखमी वाघांनी या टेस्टमध्ये कांगारुंच्या तोंडातील विजयाचा घास हिरावून घेतला. या मालिकेतील पहिल्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं भारताचा 8 विकेट्सनं पराभव केला होता. या पराभवानंतर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) पितृत्वाची रजा घेऊन मायदेशी परतला आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) उर्वरित मालिकेसाठी कॅप्टन झाला.
टीम इंडियाची भरारी
रहाणेच्या कॅप्टन्सीमध्ये सलग दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियानं जोरदार खेळ केला आहे. भारतानं मेलबर्न टेस्ट 8 विकेटनं जिंकली. सिडनीमध्ये मात्र टीम संकटात होती. पाचव्या दिवशी पराभव डोळ्यासमोर स्पष्ट दिसत होता. त्यावेळी देखील भारतीय टीमनं जिद्द सोडली नाही. हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि आर. अश्विन (R. Ashwin) या जोडीनं 250 पेक्षा जास्त बॉल पार्टरनशिप करत टीम इंडियाचा पराभव टाळला. या खेळीदरम्यान हे दोघंही जखमी झाले. तरीही त्यांचा निर्धार ढळला नाही.
टीम इंडियाचा कॅप्टन अजिंक्य रहाणे या कामगिरीवर भलताच खूश आहे. त्यानं या मॅचनंतरच्या पहिल्याच प्रतिक्रियेत त्यानं टीमची प्रशंसा केली आहे.
काय म्हणाला रहाणे?
सिडनी टेस्टनंतर केलेल्या ट्विटमध्ये रहाणे म्हणतो, “ जखमी झालो, तुटलो पण हरलो नाही. खेळाडूंची लढाऊ वृत्ती पाहून आनंद झाला. यामधून खूप काही शिकलो. ब्रिस्बेन टेस्टमध्ये आणखी सुधारणा करुन उतरणार आहोत.’’
Bruised. Broken. But never short of character. Really happy with how the boys fought till the end. Lots to learn and improve as we look forward to Brisbane now. pic.twitter.com/4VBZGCvbnp
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) January 11, 2021
रहाणेनं सांगितली टीमची योजना
सिडनी टेस्टनंतर रहाणेनं पाचव्या दिवसाची योजना सांगितली. “आज सकाळी आमची बैठक झाली. या बैठकीत आम्ही शेवटपर्यंत खेळण्याचा निर्धार केला होता. आम्ही परिणामाचा विचार न करता खेळावर लक्ष केंद्रीत करण्याचं ठरवलं होतं.’’ असं रहाणेनं सांगितलं. पाचव्या दिवशी चांगला खेळ करणारे ऋषभ पंत, हनुमा विहारी आणि आर. अश्विनची त्यानं प्रशंसा केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Team india