अॅडलेड, 18 डिसेंबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पहिल्या टेस्टला अॅडलेडमध्ये सुरुवात झाली आहे. या टेस्टच्या पहिल्या दिवशी भारताला दोन धक्के लवकर बसले. त्यानंतर भारतीय टीमनं (Team India) कमबॅक केलं. भारतीय टीम पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजवणार असं वाटत असतानाच विराट कोहली (Virat Kohli) रन आऊट झाला. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांच्यातील ताळमेळ बिघडल्यानं विराट आऊट झाला. पहिल्या दिवसाच्या अखेरीस विराटच्या रन आऊटचीच सर्वत्र चर्चा होती. या रन आऊटला जबाबदार असलेल्या अजिंक्य रहाणेच्या नावावर एक दुर्दैवी रेकॉर्ड या निमित्तानं जमा झाला आहे.
रहाणेसाठी 2020 दुर्दैवी
भारतीय टेस्ट टीमचा उपकर्णधार असलेला अजिंक्य हा चांगल्या ‘रनिंग बिटविन द विकेट’साठी ओळखला जातो. अजिंक्यनं 2013 साली टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतरची सलग सहा वर्ष रहाणेच्या नावावर एकाही सहकाऱ्याला रन आऊट न करण्याचा रेकॉर्ड होता. टेस्ट क्रिकेटमध्ये एकदाही रन आऊट न करता 200 पार्टरनरशिप करणारा रहाणे हा एकमेव बॅट्समन आहे.
अजिंक्य रहाणेचं चक्र 2020 साली फिरले. न्यूझीलंड विरुद्ध वेलिंग्टनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये रहाणे आणि ऋषभ पंत एकत्र बॅटिंग करत होते. रहाणेनं एक रन काढण्यासाठी कॉल दिला. न्यूझीलंडचा फिल्डर वेगानं बॉलच्या दिशेनं जात असल्यानं पंतची रन घेण्याची इच्छा नव्हती. पण तो पर्यंत रहाणे रन काढण्यासाठी निघाला होता. त्यामुळे नाईलाजानं पंतनं त्याला प्रतिसाद दिला आणि तो आऊट झाला. त्यानंतर आता एकाच टेस्टच्या अंतरानं रहाणेमुळे विराट कोहली रन आऊट झाला.
अॅडलेड टेस्टच्या पहिल्या दिवशी 77 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर रहाणेनं एक रन साठी कॉल दिला आणि तो लगेच माघारी फिरला. विराट कोहली अर्ध्या क्रिझपर्यंत आला होता. जोश हेजलवूडनं काहीही चूक केली नाही, त्यानं बॉलरच्या दिशेनं थ्रो करत विराटला रन आऊट केले. विराट 74 रन्सवर आऊट झाला.
टेस्ट क्रिकेटमध्ये 200 पेक्षा जास्त पार्टरनरशिपमध्ये एकही रन आऊट न करणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या नावावर आता तीन टेस्टमध्ये दोन जणांना रन आऊट करण्याचा दुर्दैवी रेकॉर्ड झाला आहे.
8 वर्षानंतर विराट रनआऊट
8 वर्षानंतर विराट कोहली पहिल्यांदाच तर त्याच्या टेस्ट कारकिर्दीमध्ये दुसऱ्यांदा रनआऊट झाला आहे. याआधी 2012 साली विराट ऍडलेडमध्येच विराट रनआऊट झाला होता.