दुबई, 22 ऑक्टोबर : कोरोना व्हायरस (Corona Virus) चा फटका आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे. यंदाच्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी-20 वर्ल्ड कप पुढे ढकलण्यात आला आहे. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या मॅचही ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे आयसीसी (ICC) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधल्या ज्या टेस्ट सीरिज कोरोनामुळे स्थगित झाल्या त्यांचे पॉईंट्स वाटण्याच्या तयारीत आहे. इएसपीएन क्रिकइन्फोमध्ये आलेल्या वृत्तानुसार पुढच्या महिन्यात होणाऱ्या क्रिकेट समितीच्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार एक पर्याय पॉईंट्स वाटण्याचा आहे, तर दुसरा ज्या मॅच मार्च 2021 पर्यंत खेळवल्या जातील, त्याच मॅचच्या पॉईंट्सचा विचार करणं हा आहे. पॉईंट्स टेबलमध्ये शेवटचं स्थान मार्चपर्यंत खेळवण्यात आलेल्या मॅचवर ठरवता येऊ शकतं. टीमने मिळवलेल्या विजयाच्या पॉईंट्सची टक्क्यांच्या आधारावर गणना होऊ शकते.
सध्या प्रत्येक सीरिजसाठी 120 पॉईंट्सची गणना केली जाते. मॅचच्या संख्येवर (दोन, तीन, चार, पाच मॅच) हे पॉईंट्स वाटले जातात. म्हणजेच दोन टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी जिंकणाऱ्या टीमला एका मॅचचे 60 पॉईंट्स मिळतात, तर ड्रॉ झाल्यास दोन्ही टीमना 30 पॉईंट्स दिले जातात. अशाच प्रकारे तीन आणि चार टेस्ट मॅचच्या सीरिजचे पॉईंट्सही वाटले जातात.
वेबसाईटच्या वृत्तानुसार आयसीसी हे पॉईंट्स स्थगित झालेल्या सीरिजच्या एकूण पॉईंट्सपैकी एक तृतियांश पॉईंट्स वाटण्याच्या तयारीत आहे. म्हणजेच कोरोनामुळे ज्या मॅच खेळवल्या गेल्या नाहीत, त्यांना ड्रॉ मानलं जाईल. अशा स्थितीमध्ये दोन्ही टीमना एक टेस्टसाठी उपलब्ध असलेल्या पॉईंट्सचे एक तृतियांश पॉईंट्स मिळतील. पॉईंट्सच्या टक्क्यांसाठी सध्याच्या नियमांमध्ये बदल करण्याची गरज आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये सध्या भारतीय टीम पहिल्या क्रमांकावर आहे.