मुंबई, 15 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा पार पडली. इंग्लंडनं या स्पर्धेचं विजेतपद पटकावलं. सुरुवातीपासून विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात असलेल्या टीम इंडियाला पुन्हा एकदा रिकाम्या हातानं मायदेशी परतावं लागलं आहे. सेमीफायनल मॅचमध्ये टीम इंडियाचा 10 विकेट्सनं लाजिरवाणा पराभव झाला. त्यानंतर टीम मॅनेजमेंट आणि रोहित शर्माच्या कॅप्टन्सीवर अनेकांनी टीका केली. यामध्ये काही माजी खेळाडूंचाही समावेश आहे. टीम इंडियाचे माजी ओपनर खेळाडू आणि 1983 वन-डे वर्ल्ड कप टीमचा भाग असलेले के. श्रीकांत यांनी देखील या विषयावर मत व्यक्त केलं आहे. भारतीय टी-20 क्रिकेट टीमला नवीन कॅप्टनची गरज आहे. हार्दिक पंड्या यासाठी प्रमुख दावेदार आहे, असं के. श्रीकांत म्हणाले आहेत.
रोहित शर्मानं गेल्या वर्षी (2021) विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर टी- 20 टीमचं नेतृत्व स्वीकारलं होतं. 2022 टी-20 वर्ल्ड कप ही त्याची कॅप्टन म्हणून पहिलीच मोठी स्पर्धा होती. आपल्या पहिल्या आयसीसी स्पर्धेत रोहितनं टीम इंडियाला सेमी फायनलपर्यंत नेलं. पण, वय हा घटक त्याच्या विरोधात जात आहे. त्यामुळे 2024 मधील टी-20 वर्ल्ड कपची तयारी म्हणून हार्दिक पंड्याला कॅप्टन केलं पाहिजे, असं भारताचे माजी ओपनर कृष्णमाचारी श्रीकांत यांना वाटतं.
स्टार स्पोर्ट्स या क्रीडा वाहिनीवरील 'मॅच पॉईंट' कार्यक्रमामध्ये बोलताना श्रीकांत म्हणाले, "मी निवड समितीचा अध्यक्ष असतो तर हार्दिक पंड्याला 2024 च्या वर्ल्ड कपसाठी कॅप्टन केलं असतं. कॅप्टन म्हणून माझी त्याच्या नावालाच पहिली पसंती असेल."
12 सिझन 5 ट्रॉफी नंतर पोलार्डची इमोशनल एक्झिट, पण मुंबईसोबतच करणार हे काम!
कामाला लागा!
या आठवड्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्यात हार्दिक पंड्या भारताच्या टी- 20 टीमचं नेतृत्व करणार आहे. याबाबत श्रीकांत म्हणाले, "पुढील वर्ल्ड कपसाठी आत्तापासूनच तयारी सुरू केली पाहिजे. एका आठवड्यात न्यूझीलंडविरुद्ध सीरिज होणार आहे, त्या सीरिजपासून टीम इंडियानं तयारी सुरू केली पाहिजे."
"वर्ल्ड कपची तयारी दोन वर्षं अगोदरच सुरू केली पाहिजे. त्यासाठी आत्तापासूनच कामाला लागलं पाहिजे. सुरुवातीच्या एका वर्षात ट्रायल अँड एरर पॉलिसीचा वापर करायला हवा, जे हवे ते प्रयोग करावेत, एक वर्ष पुरेपूर प्रयत्न करावेत. नंतरच्या एका वर्षात अशी टीम तयार केली पाहिजे जी वर्ल्ड कपमध्ये सर्वोत्तम खेळ करू शकेल," असंही श्रीकांत म्हणाले.
सचिनच्या आयुष्यात 15 नोव्हेंबर आहे एकदम खास! वाचा काय आहे कारण
टीम इंडियाला कुणाची आवश्यकता?
भारतीय टीमला फास्ट बॉलर ऑल-राउंडरची आवश्यकता आहे, असं श्रीकांत यांना वाटतं. आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी त्यांनी या पूर्वीच्या वर्ल्ड कप स्पर्धांमधील भारताच्या विजयांची उदाहरणं दिली. ते म्हणाले, "आपल्याला फास्ट बॉलर ऑल-राउंडर खेळाडूंची जास्त गरज आहे. 1983चा वर्ल्ड कप, 2011चा वर्ल्ड कप आणि 2007चा टी-20 वर्ल्ड कप आपण का जिंकलो? तेव्हा आपल्याकडे अनेक फास्ट बॉलर ऑल-राउंडर आणि सेमी-ऑलराउंडर खेळाडू होते. दीपक हुड्डाचा अशाच खेळाडूंमध्ये समावेश होतो. आपल्याला त्याच्यासारख्या आणखी खेळाडूंची गरज आहे."
के. श्रीकांत यांच्या पूर्वी टीम इंडियाचे माजी कॅप्टन सुनील गावसकर यांनीदेखील टी-20 कॅप्टन म्हणून हार्दिक पंड्याच्या नावाला पसंती दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Hardik pandya, Rohit sharma