मुंबई, 5 नोव्हेंबर: टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचा आज वाढदिवस (Virat Kohli) आहे. विराटला या निमित्तानं जगभरातील फॅन्स शुभेच्छा देत आहेत. विराटनं त्याच्या सातत्यपूर्ण खेळाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड केले आहेत. तसंच तो जगातील सध्याचा सर्वाधिक कमावता क्रिकेटपटू आहे. विराटच्या यंदाच्या वाढदिवशी 2 इच्छा आहेत. या इच्छा पूर्ण झाल्या तर त्याला हा वाढदिवस आयुष्यभर लक्षात राहणार आहे.
विराटच्या या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियाची ही शेवटची टी20 स्पर्धा आहे. या स्पर्धेची सुरुवात टीम इंडियासाठी निराशाजनक झाली. पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाचा मोठा पराभव झाला. या दोन पराभवानंतर भारतीय क्रिकेट टीम स्पर्धेतून बाहेर जाण्याच्या मार्गावर आहे. अफगाणिस्तानचा 66 रननं पराभव करत टीमनं स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे. कॅप्टन विराट कोहलीच्या वाढदिवसाच्या 2 इच्छा या वर्ल्ड कप संदर्भातील आहेत.
विराटची पहिली इच्छा
विराटच्या वाढदिवशी संध्याकाळी टीम इंडिया स्कॉटलंड विरुद्ध खेळण्यासाठी उतरणार आहे. दुबईमध्ये संध्याकाळी 7.30 वाजता ही मॅच सुरु होईल. या मॅचपूर्वी विराटची नजर दुपारी शारजाहमध्ये होणाऱ्या मॅचवर आहे. शारजाहमध्ये न्यूझीलंड विरुद्ध नामिबिया (New Zealand vs Namibia) ही मॅच होणार आहे. टीम इंडियाला सेमी फायलमध्ये जाण्यासाठी न्यूझीलंडला एक पराभव आवश्यक आहे.
नामिबियानं न्यूझीलंडला पराभूत करुन धक्कादायक निकाल नोंदवला, तर विराटसाठी बर्थ-डे गिफ्ट असेल. शारजाहमधील मैदानावरच नामिबियानं आयर्लंडचा पराभव केला होता. तसंच न्यूझीलंडला स्कॉटलंड विरुद्ध खेळताना संघर्ष करावा लागला होता. त्यामुळे विराटसह टीम इंडियाला धक्कादायक निकालाची अपेक्षा असेल.
HBD Virat Kohli: रनमशिन विराट कोहलीची सर्वात मोठी डोकेदुखी, कधी मिळणार 'तो' मौका?
विराटची दुसरी इच्छा
विराटची दुसरी इच्छा पूर्ण करणे हे टीम इंडियाच्या हातामध्ये आहे. दुबईमध्ये स्कॉटलंडविरुद्ध होणाऱ्या मॅचमध्ये टीम इंडियाला मोठ्या फरकानं विजय मिळवणे आवश्यक आहे. नेट रनरेट चांगला ठेवण्यासाठी टीम इंडियाला किमान 60 रननं विजय आवश्यक आहे. टीम इंडियाला टार्गेट चेस करावे लागले तर ते 13 ओव्हरपर्यंत पूर्ण करावे लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: On this Day, T20 world cup, Virat kohli