मुंबई, 4 नोव्हेंबर: अंडर 19 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचा माजी कॅप्टन उनमुक्त चंद (Unmkut Chand) आता ऑस्ट्रेलियात खेळण्यास सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगसाठी (Big Bash League) कराबद्ध झालेला तो पहिला भारतीय पुरुष क्रिकेटर बनला आहे. 2012 साली झालेल्या अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेचं विजेतपद जिंकणाऱ्या टीम इंडियाचा उनमुक्त कॅप्टन होता.
उन्मुक्तनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली आणि उत्तराखंड टीमचं प्रतिनिधित्व केलं. तसंच दिल्ली डेअर डेव्हिल्स, मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या आयपीएल टीमचा देखील तो सदस्य होता. टीम इंडियात संधी न मिळाल्यानं निराश झालेल्या उनमुक्तनं याचवर्षी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत अमेरिकन क्रिकेट लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तो आता मेलबर्न रेनग्रेड ( Melbourne Renegades) या बिग बॅश लीगमधील टीमकडून आगामी सिझनमध्ये खेळणार आहे.
'देशाचं प्रतिनिधित्व न करणे ही सोपी गोष्ट नाही. पण, मी आता अमेरिकेत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेत आहे. त्याचबरोबर मी जगभरातील क्रिकेट लीगमध्ये खेळू शकणार आहे. ही माझ्यासाठी चांगली संधी आहे. मला बिग बॅश लीगमधील क्रिकेट पाहायला नेहमी आवडते. ही एक मोठी संधी आहे. या स्पर्धेत येणाऱ्या वर्षात माझा ठसा उमटवण्याचा मी प्रयत्न करणार आहे', असं उन्मुक्तनं यावेळी सांगितलं.
T20 World Cup: इंग्लंडच्या अंपायरला चूक भोवली, स्पर्धेतून झाली हकालपट्टी
उनमुक्त चंदने भारतीय क्रिकेटमध्ये खेळताना 67 प्रथम श्रेणी मॅचमध्ये 31.57 च्या सरासरीने 3,379 रन केले, यात 8 शतकांचा समावेश होता. लिस्ट ए क्रिकेटमध्ये उनमुक्त चंदने 41.33 च्या सरासरीने 4,505 रन केले, ज्यात 7 शतकं होती. टी-20 क्रिकेटमध्येही त्याने 3 शतकं केली, पण त्याची सरासरी फक्त 22.35 एवढी होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Cricket news, Team india